नायरमधील 125 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस; चार महिने पाठपुरावा

भाग्यश्री भुवड
Monday, 26 October 2020

ऑक्‍सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविड-19 या बहुप्रतीक्षित लसीच्या चाचणीचा पहिला डोस नायरमधील 125 जणांना देण्यात येणार आहे.

मुंबई : ऑक्‍सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविड-19 या बहुप्रतीक्षित लसीच्या चाचणीचा पहिला डोस नायरमधील 125 जणांना देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यापासून दुसरा डोस देण्यात येणार आहे. 

हेही वाचा नवीन जागेची थकीत वीजबिल वसुली विद्यमान मालकाकडूनच; ग्राहक न्यायालयाचा याचिकेवर निर्णय

ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या लसीवर मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात चाचणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 100 जणांना लस देण्यात येणार होती. त्यानुसार आज केईएम रुग्णालयातील सहा जणांना दुसरा डोस देण्यात आला; मात्र आता आयसीएमआरकडून आलेल्या सूचनेनुसार नायर रुग्णालयात 100 जणांऐवजी 125 जणांना लस देण्यात येणार आहे.

हेही वाचा फेक टीआरपी प्रकरण! कोलवडेला पोलिस कोठडी मिश्राला जामीन; आतापर्यंत 10 जण ताब्यात 

कोव्हिशिल्डच्या अतिरिक्त 25 जणांना पहिला डोस दिल्यानंतर पुढील आठवड्यात दुसऱ्या डोसची तयारी करण्यात येणार असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली. 28 सप्टेंबरला नायरमध्ये तीन स्वयंसेवकांना कोव्हिशिल्डची लस देण्यात आली होती. स्वयंसेवकांचा चार महिने पाठपुरावा केला जाईल. या अभ्यासाचा संपूर्ण कालावधी सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत असणार आहे. नायरमध्ये पुढील आठवड्यापासून दुसऱ्या डोसच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असली, तरी केईएममधील स्वयंसेवकांना 26 ऑक्‍टोबरपासून दुसरा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. चाचण्यांच्या पहिल्याच दिवशी 20 ते 45 वयोगटातील तीन स्वयंसेवकांना डोस दिला होता. त्यांना आता 28 दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येत असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
------------------------------------------------------ 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first dose of the covshield vaccine to 125 volunteers in Nair Four months follow up