मुंबईकरांचा ''नो पार्किंग''चा दंड कमी पण....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

  • महापालिकेचे सुधारित परिपत्रक;
  • नगरसेवकांचा विरोध कायम 
  • बेकायदा पार्किंगच्या दंडात कपात 

मुंबई : महापालिकेने बेकायदा पार्किंगला आळा घालण्यासाठी लागू केलेला 10 हजारांचा दंड आता कमी केला जाणार आहे. पार्किंगच्या दराच्या 40 पट आणि वर्दळीच्या रस्त्यांवर दुप्पट दर आकारले जातील, असे सुधारित परिपत्रक प्रशासनाने जारी केले; परंतु त्याला तीव्र विरोध करणारे नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात जुंपण्याची शक्‍यता आहे. 

महत्वाचं - समाजमाध्यम ठरतंय दोघात तिसरा

मुंबईत बेकायदा पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या धोरणानुसार बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर पाच ते 23 हजारांपर्यंत दंड आकारण्यात येत होता. महापालिकेच्या वाहनतळापासून 500 मीटरच्या आत बेकायदा पार्किंग केल्यास दंड वसूल केला जातो. हा दंड भरण्यास नागरिक नकार देत असल्यामुळे वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. हे वाहनतळ अनेक निवासी वसाहतींजवळ असल्याने तेथील रहिवाशांनीही या धोरणाला विरोध दर्शवला होता. 

मुंबई महापालिकेत 680 कोटींचा पाणी घोटाळा

या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने बेकायदा पार्किंगबद्दल आकारला जाणारा 10 हजारांचा दंड कमी करण्याचा निर्णय घेऊन तसे सुधारित परिपत्रक जारी केले. वाहनतळाबाहेर बेकायदा पार्किंग केल्यास आता 40 पट दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम कमी केल्यास वाहनचालकांना दिलासा मिळेल. मोठी वर्दळ असलेले एम. के. रोड, एस. व्ही. रोड, एलबीएस मार्ग, न्यू लिंक रोड या चार महत्त्वाच्या रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगबद्दल मात्र मोठा दंड आकारला जाणार आहे. नगरसेवकांनी या सुधारित परिपत्रकाला विरोध दर्शवला आहे. 

महत्वाचं - एसटीच्या गाडगेबाब स्वच्छता योजनेचा बोजवारा

पार्किंगचे दर दुप्पट 
बेकायदा पार्किंगच्या दंडाची रक्कम कमी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु महापालिकेने पार्किंगचे दर मात्र दुप्पट केले आहेत. 

बेकायदा पार्किंगबद्दल दंड (महत्त्वाचे चार रस्ते वगळता) 

वाहन पूर्वी सुधारित 
दुचाकी 5000 1800 
तीन-चार चाकी 10,000 4000 
रिक्षा, टॅक्‍सी 8000 4000 
सार्वजनिक बस 11,000 7000 
ट्रक 15,000 10,000 

एम. के. रोड, एस. व्ही. रोड, एलबीएस मार्ग, न्यू लिंक रोड या रस्त्यांवर 

वाहन पूर्वी सुधारित 
दुचाकी 5000 3400 
तीन-चार चाकी 10,000 8000 
रिक्षा, टॅक्‍सी 8000 4000 
सार्वजनिक बस 14,000 7000 
ट्रक 19,800 10,000 

 

निवडणूक काळात प्रशासनाने पार्किंगचे धोरण ठरवले होते. नगरसेवकांनी दर कमी करण्याबाबत पत्रे दिली होती. मुंबईकरांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत होता. सुधारित दरांचा आढावा घेतला जाईल. पार्किंग धोरणामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. 
- यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती,

मुंबई महापालिका

 

बेकायदा पार्किंगबद्दल आकारल्या जाणाऱ्या दंडाला नागरिकांचा विरोध आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. महापालिकेचे सुधारित परिपत्रक लोकांची दिशाभूल करणारे आहे. या संदर्भात स्थायी समिती आणि महासभेत विरोध करू. 
- रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reduction in fines for illegal parking but...