उल्हासनगर-अंबरनाथकरांच्या घशाला मिळणार बारमाही ओलावा

दिनेश गोगी
शुक्रवार, 20 जुलै 2018

उल्हासनगर : पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असल्याने घशाला कोरड बसणाऱ्या उल्हासनगर-अंबरनाथकरांच्या घशाला आता बारमाही ओलावा मिळणार आहे.

उल्हासनगर : पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असल्याने घशाला कोरड बसणाऱ्या उल्हासनगर-अंबरनाथकरांच्या घशाला आता बारमाही ओलावा मिळणार आहे. पाण्याच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी या दोन्ही शहराला वाढीव पाणी पुरवठा देण्याच्या मागणी करिता गेल्या दोन वर्षांपासून मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवणारे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज अखेर यश मिळाले असून बारवी धरणातून उल्हासनगरला 50 एमएलडी व अंबरनाथला 30 एमएलडी पाण्याचा वाढीव कोटा आजच्या नागपूर विधी मंडळात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मंजूर केला आहे.घशाला बारमाही ओलावा मिळणार असल्याने दोन्ही शहरातून डॉ.बालाजी किणीकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.

उल्हासनगर-अंबरनाथ या दोन्ही शहरांना होत असलेला पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने या दोन्ही शहरास वाढीव पाणीपुरवठा मंजूर होण्याकरिता आमदार डॉ. किणीकर सातत्याने पाठपुरावा करीत होते. याकरिता उद्योग मंत्री,जलसंपदा मंत्री,पाणी पुरवठा मंत्री, जलसंपदा राज्यमंत्री तसेच संबधित विभागाचे सचिव यांच्या दालनात वारंवार बैठकाही घेण्यात आल्या होत्या. तसेच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन देखील केले होते. वारंवार बैठका, शासनाकडे निवेदने देऊन ही पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लागत नसल्याने आमदार डॉ. किणीकर यांनी लक्षवेधी सूचना विधी मंडळात सादर केली होती. यावर उत्तर देताना या दोन्ही शहरामध्ये पाणी टंचाई असल्याचे मान्य करत जलसंपदा राज्यमंत्री  विजय शिवतारे यांनी वाढीव कोट्यास मंजुरी दिली आहे.

सद्यस्थितीला अंबरनाथ शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 46 एमएलडी, चिखलोली धरणातून 6 एमएलडी व एमआयडीसी कडून 10 एमएलडी पाणी पुरवठा होत असून तो अपुरा पडत आहे. तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे स्वत:चे पाणीपुरवठ्याचे स्त्रोत नसल्याने सध्या महाराष्ट्र विकास महामंडळाकडून 140 एमएलडी पाणी पुरवठा संपूर्ण उल्हासनगर शहरास करण्यात येतो. यंदा धरण क्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे. मुबलक पाणीसाठा असतानाही  उपलब्ध आहे. असे असतानाही शहरामध्ये एक दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची बाब ही आमदार डॉ. किणीकर यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्यावर शिवतारे यांनी वाढीव कोट्यास मंजूरी दिल्याने उल्हासनगर-अंबरनाथकर सुखावून गेले आहे.नागरिकांच्या घशाला ओलावा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे डॉ.बालाजी किणीकर यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आधार प्रतिष्ठानचे संस्थापकअध्यक्ष संदीप डोंगरे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: regular water supply to ulhasnagar and ambarnath citizens