esakal | कोरोनामुळे लगाम; दादा, भाई 'क्वारंटाईन'
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे लगाम; दादा, भाई 'क्वारंटाईन'

प्राणी-पक्षी, पिस्तूल तस्करी, अनधिकृत बांधकामे, रेती उपसा, गावठी दारू भट्टी अशा अनेकविध गोरखधंद्यांमुळे ठाणे जिल्हा नेहमीच चर्चेत असतो. एरवी बिनधास्त बेकायदा व्यवसाय करणारे 'दादा', 'भाईं'नीही कोरोनाच्या संकटामुळे घरातच बसणे पसंत केले आहे.

कोरोनामुळे लगाम; दादा, भाई 'क्वारंटाईन'

sakal_logo
By
मयूरी काकडे-चव्हाण

डोंबिवली : प्राणी-पक्षी, पिस्तूल तस्करी, अनधिकृत बांधकामे, रेती उपसा, गावठी दारू भट्टी अशा अनेकविध गोरखधंद्यांमुळे ठाणे जिल्हा नेहमीच चर्चेत असतो. एरवी बिनधास्त बेकायदा व्यवसाय करणारे 'दादा', 'भाईं'नीही कोरोनाच्या संकटामुळे घरातच बसणे पसंत केले आहे.

रेती माफियांना रेतीउपसा करणे शक्‍य नसल्याने कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याणनजीकच्या खाडी किनाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे रेती, भू आणि चाळमाफियांच्या साखळीचे आर्थिक गणितही कोलमडले आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी तयार होणाऱ्या गावठी दारूच्या भट्ट्याही बंद असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

महत्त्वाचे ः सोशल व्हायरसपासून सावधान...! कारण हा कोरोनापेक्षाही आहे भयंकर.

अनधिकृत बांधकामांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका नेहमीच वादग्रस्त ठरली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे टिटवाळा, डोंबिवली, 27 गावे या भागात नव्याने उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आळा बसला आहे. रेतीच्या एका ब्रासची किंमत साडेसहा हजार ते आठ हजार आहे.

डोंबिवलीतील मोठा गाव आणि कोपर खाडीकिनारा येथे 30 ते 40 संक्‍शन पंप लावून शेकडो ब्रास रेतीचा उपसा केला जातो. दिवा येथे वेगाने चाळी उभारण्यासाठी चाळमाफियांमध्ये स्पर्धा सुरू असते. मात्र, कोरोनाने या सर्व बेकायदा व्यवसायांना लगाम घातला आहे.

क्लिक करा : कोरोनामुळे छायाचित्रकारांवर संक्रांत  

यूट्युब व समाजमाध्यमांच्या माध्यमातून अवैध चाळींच्या दिसणाऱ्या आकर्षक जाहिरातीही सध्या दिशेनाशा झाल्या आहेत. रेती उपसण्यासाठी, ती वाहण्यासाठी, बांधकामे करण्यासाठी कामगारच नसल्याने सर्व गणित कोलमडल्याचे बांधकाम व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

दारूभट्ट्याही बंद 
जिल्ह्यात मुरबाड, शहापूर, अंबरनाथ , बदलापूर , शीळ डायघर परिसरातील गावठी दारूच्या भट्ट्याही पूर्णपणे बंद झाल्या असून, सकाळी नदी किनाऱ्यावर दिसणारा धूर आता नाहीसा झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. भट्टीमालक, त्याची वाहतूक करणारेही कोरोनाच्या धास्तीने घरी बसले असून, दारू बनविणाऱ्या परप्रांतीय कामगारांनीही आपआपल्या राज्यात पळ काढला आहे. 

पिस्तूल तस्करी मंदावली 
राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड येथील गावठी पिस्तुलांना राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पिस्तुल तस्करीमध्ये खूप मोठी साखळी असल्याने सद्यस्थिती पाहता या बेकायदा व्यवसायांना कोरोनामुळे आळा बसला असून, वारंवार गोळीबाराने हादरणारे डोंबिवली शहरही निवांत श्वास घेत आहे. 

गेल्या काही दिवसांत प्राण्यांच्या कातडीची तस्करी, पिस्तूल तस्करी व इतर बेकायदा व्यवसायांच्या एकही कारवाईची घटना घडली नाही. याअगोदरच दारूच्या अवैध वाहतुकीवरही कारवाई करून आम्ही आटोक्‍यात आणली आहे. 
- संजू जॉन,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
कल्याण गुन्हे शाखा  

 
 

loading image