अरे बापरे! रुग्णालयाने कोरोनाबाधित असूनही कळवलेच नाही; नातेवाईकांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असतानाच सायन रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

चेंबूर : कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असतानाच सायन रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर येत आहे. रुग्णालयात किडनीच्या उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला कोरोनाची बाधा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही रुग्णालयाने आम्हाला वेळीच कळवले नाही, असा दावा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी न घेता रुग्णाच्या संपर्कात आल्याने आम्हालाही कोरोनाचा धोका निर्माण झाल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. 

महत्वाची बातमी ः धारावीत कोरोना रुग्णांचा उच्चांंक; एका दिवसात रुग्णांची संख्येत मोठी वाढ

चेंबूर येथील पी. एल लोखंडे मार्गावरील सिद्धार्थ नगरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्याने त्यांना सायन रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर जनरल वाॅर्ड क्रं. 5 मध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रुग्णालयाने त्यांची कोरोना चाचणी केली.  शुक्रवारी (ता. 23) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला; तरीही रुग्णालयाने आम्हाला अंधारात ठेवल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. शनिवारी दुपारी रुग्णाचा मृत्यू झाला. यादरम्यान आम्ही रुग्णास घरून जेवण व फळे दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले. शनिवारी दुपारी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाच्या बहिणीला मृतदेह घरी घेऊन जाण्यास सांगितले. रुग्णाची बहिण आपली मुलगी व समोरील व्यक्तीसह रुग्णालयात आली.  ते मृतदेह घेऊन जाण्याची लगबग करत असतानाच एकाने मृत्यूचे कारण विचारल्यावर डॉक्टरांनी कोरोना झाल्याचे सांगितले. त्यामुळे भीतीपोटी सर्वजण मृतदेह तेथेच सोडून घरी निघाले.

मोठी बातमी ः नवी मुंबईत डिलिव्हरी बॉयलाही कोरोना, दिवसभरात 23 नवे रुग्ण

दरम्यान, रहिवाशांना ही घटना समजताच त्यांनी रुग्णाची बहीण, भाची व शेजारील व्यक्तीला परिसराबाहेर थांबण्यास सांगितले. तिघेही कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याची माहिती रहिवाशांनीच पालिकेला दिली. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी रात्रीच तिघांना क्वारंटाईन केले. तसेच, सकाळी रुग्णाच्या घरातील 6 जणांना क्वारंटाईनसाठी नेले. रुग्णालयाने कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह असल्याची माहिती वेळीच दिली असती, तर कुटुंबावर ही वेळ आली नसती, असे नातेवाईकांचे म्हण्णे आहे.
 

या रुग्णाबाबत मला माहिती नाही. कोरोना बाधित रुग्ण असलेल्या वाॅर्डमध्ये जाण्यास कोणालाही  परवानगी नाही. उपचारादरम्यान एखादा रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आम्ही तातडीने नातेवाईकांना देतो.
- राजीव सिंग, सहाय्यक वैद्यकिय अधिकारी, सायन रुग्णालय 

रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येऊनही आम्हाला सांगितले नाही. मृतदेह कपड्यात बांधण्यासाठीही कर्मचाऱ्याने आमच्या एका नातेवाईकाला बोलावले. नंतर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. आम्हाला पुर्वीच माहिती दिली असती तर आम्ही खबरदारी घेतली असती. नातेवाईकांनाही बोलावले नसते. डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आम्हाला हे भोगावे लागत आहे. 
-  मयत रुग्णाची बहीण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: relative claimed on hospital to not sharing about corona