धार्मिक सलोख्याचा त्रिवेणी संगम!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंबई - नाताळनिमित्त माहीम चर्चमध्ये झालेली भाविकांची गर्दी, त्याच परिसरातील बाबा मखदूम शाहंच्या उरुसाला लोटलेला जनसमूह आणि काही अंतरावरील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थीप्रीत्यर्थ आलेला भक्तांचा ओघ असे दृश्‍य मंगळवारी मध्य मुंबईत दिसत होते. विविध धर्मीय तीन सण एकाच दिवशी आल्याने मध्य मुंबई धार्मिक सलोख्याचे प्रतीक ठरत आहे.

प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त हिंदू भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नाताळची सुट्टी असल्यामुळे गर्दीत वाढ झाली होती. त्यामुळे पोलिसांनी वाहतुकीत बदल केले होते. सिद्धिविनायक मंदिरात अभिषेक आणि विशेष पूजा झाली. मंदिरावर फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. दत्ता राऊळ मैदानाजवळ भाविकांच्या रांगांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

प्रभादेवीपासून काही अंतरावर असलेल्या माहीममधील सेंट मिशेल चर्चमध्ये नाताळनिमित्त सोमवारी मध्यरात्रीपासूनच ख्रिस्ती भाविकांचा प्रार्थनेसाठी ओघ सुरू झाला होता. भारतातील जुन्या चर्चमधील एक असलेले सेंट मिशेल चर्च १६ व्या शतकात बांधण्यात आले आहे. दरवर्षी नाताळमध्ये या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. कॅरोल गायनाला पर्यटकही उपस्थित राहतात. तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाबा मखदूम शाह माहिमी यांच्या दर्ग्यातही उरूस सुरू आहे. मुंबई पोलिसांनी २१ डिसेंबरला चादर चढवल्यानंतर उरुसाला सुरुवात झाली. उरूस ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

पोलिस यंत्रणेची कसोटी
तीन धर्मांचे सण एकाच वेळी सुरू असल्यामुळे पोलिसांची धावपळ झाली. सेक्रेड हार्ट चर्च, माहीम चर्च, पोर्तुगीज चर्च, सिद्धिविनायक मंदिर व माहीम दर्गा परिसरात ७००० पोलिस व वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते. अनेक ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली होती. पोर्तुगीज चर्चपासून वाहतूक सयानी रोडच्या दिशेने वळवण्यात आली होती. माहीममध्ये टोईंग व्हॅन सज्ज होती.

Web Title: Religious Angarakhi Chaturthi Christmas Celebration