अधिकाऱ्यांना आधी पदावरून हटवा, मगच कॅग चौकशी; समाजवादी पक्षाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CAG

मुंबई महानगरपालिकेतील १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या ७६ कामांची चौकशी कॅगमार्फत केली जाणार आहे.

अधिकाऱ्यांना आधी पदावरून हटवा, मगच कॅग चौकशी; समाजवादी पक्षाची मागणी

मुंबई - मुंबई महानगरपालिकेतील १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या ७६ कामांची चौकशी कॅगमार्फत केली जाणार आहे. पालिका आयुक्तांना खर्चाचे अधिकार दिलेल्या काळातील ही चौकशी आहे. अशी चौकशी करताना संबंधित अधिकारी त्याच पदावर कार्यरत असणे हे शासनाच्या नियमावलीनुसार योग्य नाही. यासाठी पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंग चहल यांना पदावरून हटवावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार व पालिकेतील माजी गटनेते रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुंबई पालिकेच्या १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या ७६ कामांची कॅग द्वारे चौकशी करण्याचे निर्देश राज्य सरकाने दिले आहेत. राज्य शासनाने हा घेतलेला निर्णय अत्यंत धाडसी असल्याचे शेख यांनी म्हटले आहे. या निर्णयाचे समाजवादी पक्षाने स्वागत केले आहे. याबाबत वारंवार राज्य सरकार, पालिका आयुक्त यांच्याकडे आपणही लेखी तक्रार केली होती असे शेख यांनी म्हटले आहे. पालिकेमार्फत निशल्प रियल्टीज यांच्याकडून दहिसर येथील जमीन व्यवहारातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत तत्कालीन विधानसभा अध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून दिली आहे असे शेख यांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने १७ मार्च २०२० रोजी आयुक्तांकडे आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते.

याबाबत स्थायी समितीमार्फत ठराव देखील पारित करण्यात आला होता. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यकाळामधील विकास कामांची कॅग मार्फत चौकशी सुरू होणार आहे. तेच अधिकारी सद्यस्थितीत त्याच पदावर कार्यरत असणे शासनाच्या नियमावलीनुसार योग्य नाही. सदर चौकशीमध्ये प्रशासकीय अधिकारी हस्तक्षेप करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना पदावरून हटवून योग्य चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.