दक्षिण मुंबईतील वाहतूक नियोजनाबाबत अहवाल द्या! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई : दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटसह अन्य गर्दीच्या ठिकाणच्या वाहतुकीचे नियोजन करण्याबाबतचा अहवाल दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. गाडी आहे म्हणून कुठेही पार्क करण्याला परवानगी देऊ नका, असेही न्यायालयाने सुनावले आहे. 

क्रॉफर्ड मार्केट, झवेरी बाजार, भुलेश्‍वर आदी बाजारपेठा असलेल्या ठिकाणी वाहतुकीची समस्या वाढत आहे, असे नमूद करणारी जनहित याचिका स्थानिक रहिवासी राकेश शुक्‍ला यांनी न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते आणि तेथे मालवाहतूक करणाऱ्या तसेच खासगी वाहनांची वाहतूक सुरू असते. या परिसरात पार्किंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होते. तेथे वाहतुकीचे नियोजन होत नाही. पादचाऱ्यांना चालण्याची कमी जागा उपलब्ध होते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो, असे याचिकादाराने नमूद केले आहे. 

या परिसरात वाहतुकीचे नियोजन करण्यासंदर्भात समितीची नियुक्ती केली आहे. या भागांची पाहणीही करण्यात येत आहे, अशी माहिती वाहतूक विभागाच्या वतीने न्यायालयात देण्यात आली. पादचाऱ्यांच्या अधिकारांवर आक्रमण होता कामा नये, त्यामुळे गाडी असली तरी ती कुठेही पार्क करू, असे होता कामा नये, असे खंडपीठाने सुनावले. वाहनांची संख्या मर्यादित ठेवण्याचा पर्यायही न्यायालयाने सुचवला आहे. 

Web Title: Report about traffic planning in South Mumbai!