esakal | सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा; परिवहन मंत्र्यांना अटक करा, भाजप नेत्यांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा; परिवहन मंत्र्यांना अटक करा, भाजप नेत्यांची मागणी

दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. तर जो न्याय अर्णब गोस्वामीला लावला तोच न्याय या आत्महत्याप्रकरणी लावून परिवहनमंत्री अनिल परब यांना अटक करणार का, असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. 

सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा; परिवहन मंत्र्यांना अटक करा, भाजप नेत्यांची मागणी

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबईः  दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तर जो न्याय अर्णब गोस्वामीला लावला तोच न्याय या आत्महत्याप्रकरणी लावून परिवहनमंत्री अनिल परब यांना अटक करणार का, असा प्रश्न भाजप नेते अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून या दोन्ही भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. दरेकर यांनी तर यापूर्वी या प्रश्नी एसटीचे उच्चाधिकारी तसेच परब यांचीही भेट घेतली होती. 

पगार मिळत नसल्यामुळे गेल्या दोन दिवसात एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तरीही हे ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे. त्यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या ठाकरे सरकारवर 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार देण्याची आजची परब यांची घोषणा तात्पुरती मलमपट्टी आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांना पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा:  मुंबईत अग्निशस्त्र घेऊन आलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

परब यांना अटक करा - भातखळकर

एसटी कर्मचारी मनोज चौधरी यांनी आत्महत्या केली असून आपल्या मृत्यूला ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वीच्या चिठीत स्पष्टपणे लिहिले आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करणाऱ्या ठाकरे सरकारने तोच न्याय मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणात लावावा. त्यानुसार मनोज चौधरी यांच्या मृत्यूला कारणीभूत मानून परिवहनमंत्री अनिल परब यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. 

अधिक वाचाः  शिवडी रुग्णालय मृतदेह प्रकरणः डॉक्टर, परिचारिकांना बडतर्फ करण्याचा निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. एकीकडे मंत्र्यांच्या बंगल्यावर व गाड्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करायचे, अनावश्यक विषयांत वकिलांना करोडो रुपये फी द्यायची पण दुसरीकडे कोरोनाचे कारण पुढे करत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रोखून ठेवायचा हे पाप ठाकरे सरकार करत आहे. वारंवार मागणी करूनही एसटी कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे महापाप ठाकरे सरकार करीत असल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला.

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Report homicide the government Arrest transport ministers BJP leaders demand

loading image