पॉवरलूमला अच्छे दिन केव्हा?

Hemant-Maru
Hemant-Maru

महाराष्ट्रातील जी शहरे दंगलीसाठी कुप्रसिद्ध होती, त्यापैकीच एक म्हणजे भिवंडी (जि. ठाणे). मात्र आता हे चित्र तसे राहिले नाही. ‘भाईचारा’ हे या शहराचे आता वैशिष्ट्य बनले आहे. या शहराचा गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी होता तोच चेहरा आजही दिसत असला तरी येथे आता मोठी विकासकामे सुरू आहेत. शहरात प्रवेश करताना जागोजागी गर्दी आणि वाहतूक ठप्प दिसत असली तरी येत्या काही वर्षांत वाहतुकीचा प्रश्‍नही मार्गी लागण्याची शक्‍यता आहे.

हे शहर दुसऱ्या एका महत्त्वाच्या कारणासाठीही ओळखले जाते ते म्हणजे पॉवरलूम. लाखो कामगार किंवा कष्टकऱ्यांचे संसार या व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र आता या व्यवसायाला घरघर लागली आहे. याविषयी भिवंडी पॉवरलूम असोसिएशनचे पदाधिकारी हेमंत मारू यांनी अडचणीचा पाढा वाचला. तसेच सरकारकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘‘आम्ही पॉवरलूमचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून करीत आलो. एक काळ असा होता की अडचणींना सामोरे जावे लागत नसे. आता तशी परिस्थिती राहिली नाही. पॉवरलूमसमोर ॲटोमॅटीक लूमने आव्हान उभे केले आहे. विजेचा प्रश्‍न आहे, मजूर मिळत नाही. आमचे जे जपानी लूम आहेत ते येथे राहिले नाहीत. जवळजवळ या व्यवसायात आठ नऊ लाख लोकांचा थेट सहभाग होता तो राहिला नाही. हेच पॉवरलूम गुजरातमध्ये स्थलांतरित झाले आहेत. तेथील सरकारने त्यांना सवलती दिल्या आहेत.’’

‘येथील अनेक मंडळीनी हा व्यवसायच बंद केल्याने मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. दीड लाख कष्टकऱ्यांनी तर हे शहरच सोडले असून ते पुन्हा या शहराकडे परतलेच नाहीत. काही मंडळींच्या हाताला काम नसल्याने जगण्याच्या लढाईत ते पडेल ते काम करीत असतात. आम्हाला वीजपुरवठा करणाऱ्या तोरण पॉवर आणि वीज महामंडळाकडून मदत मिळत नाही. तसेच जीएसटी, नोटाबंदीचा मोठा फटका आम्हाला बसला अशा एक ना अनेक अडचणीत आहेत. सरकार दरबारी आम्ही न्याय मागतो आहोत,’’ असे ते म्हणाले.

मायबाप सरकारने या व्यवसायाकडे आणि त्यावर अवलंबून असलेल्या कष्टकऱ्यांकडेही सहानुभूतीने पाहिले पाहिजे इतकीच आमची माफक आशा आहे असेही मारू यांनी सांगितले. ‘‘सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यवसायात राबणारे हात उच्चशिक्षित नाहीत. त्यापैकी काही मालक तर काही कामगार आहेत. कामगारांचे आरोग्य, त्यांचे भविष्य म्हणजेच असंघटीत कामगारांना न्याय देण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे असेही ते म्हणाले. ठाणे जिल्ह्यातील आणि भिवंडी शहरातील सर्वच पक्षांची मंडळी मदत करतात पण, प्रश्‍न मार्गी लागत नाहीत. ते कसे मार्गी लागतील याची आम्हाला प्रतीक्षा आहे,’’ असेही मारू म्हणाले. संघटनेचे रतिलाला झुमारिया, रशीद ताईरमोमीन, तारिक फारूखी आदींनी या प्रश्‍नी हाच सूर लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com