"मुंबई पालिका जिंकण्यासाठी BJP-RPI चा मास्टर प्लॅन" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RPI and BJP Alliance
"मुंबई पालिका जिंकण्यासाठी BJP-RPI चा मास्टर प्लॅन"

"मुंबई पालिका जिंकण्यासाठी BJP-RPI चा मास्टर प्लॅन"

Mumbai Municipal Corporation Election : भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आगामी मुंबई महापलिकेत एकत्र निवडणुक लढणार आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेता देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. एएनआयच्या वृत्तानुसार, आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकीत दोन्ही पक्ष एकीचे बळ दाखवून देणार आहेत. रिपब्लिकन पार्टीने भाजपसोबत लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मागील 25 वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेचा कब्जा आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप- शिवसेना यांच्यातील युती तुटली. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीनं राज्यात सरकार स्थापन केले. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसने एकटा चलो रे चा नारा दिलाय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबईच्या आगामी पालिका निवडणुकीत भाजपसोबत एकत्र लढणे फायदेशी असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा: 'शेतकरी- मजुरांच्या विरोधात रचलेलं षडयंत्र हरलंय'

ज्या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केले ते शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मुंबई महानगर पालिकेत स्वतंत्र लढतील. जर भाजप आणि रिपब्लिकन पार्टीने ही निवडणुक एकत्र लढली तर त्याचा दोन्ही पक्षांना फायदा होईल, असे रामदास आठवलेंनी एका कार्यक्रमात म्हटले होते. भाजपलाही ही गोष्ट कळली असून विरोधकांना शह देण्यासाठी भाजपने आता आरपीआयसोबत एकत्र लढण्याचा इरादा पक्का केल्याचे दिसते. याचा त्यांना कितपत फायदा होणार ते निकालानंतरच स्पष्ट होईल.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे देशांमध्ये परत आणावेत ; चंद्रकांत पाटील

loading image
go to top