राखीव सदनिकाच दुसऱ्या व्यक्तीला बहाल! मास्टर लिस्ट घोटाळा प्रकरण 

file photo
file photo

मुंबई : म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना विकास मंडळाच्या (रिपेअर बोर्ड) च्या मास्टर लिस्ट घोटाळा प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. मुंबईतील एका प्रथितयश व्यक्तीच्या दादर परिसरातील राखीव सदनिकांपैकी एक सदनिका कामाठीपुऱ्यातील व्यक्तींच्या नावावर करून दिल्याचा नवा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष बाब म्हणजे म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांना अंधारात ठेवून मिळकत व्यवस्थापक आणि मुख्य लिपिक आणि लिपिक या त्रिकुटाने हा काळाबाजार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आधीच सुरू असलेल्या मास्टर लिस्ट नावे घुसडण्याच्या प्रकरणात आता या नव्या प्रकरणाची आणि संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे.

म्हाडाचे सहमुख्य अधिकारी अविनाश गोटे यांनी उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या स्वाक्षरीअंती मास्टर लिस्टमध्ये पाच नावे टाकल्याप्रकरणी चौकशी सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्यामार्फत सुरू आहे. या प्रकरणाच्या अहवालातील तपशील व्यवस्थापक श्रद्धा कुटप्पन आणि लिपिक कविता गुरव यांनी दडवल्याची बाबही उघड झाली आहे. याच दोन महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे साथीदार असलेल्या मुख्य लिपिक महेश देशपांडे यांच्या साथीने आर्थिक फायद्यासाठी केलेला नवा प्रकार आता उघड झाला आहे. राखीव सदनिकाचा सौदा उपाध्यक्ष आणि उपमुख्य अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून केल्याचे कागदपत्रांवरून उघड झाले आहे. सदर प्रकरणाची कागदपत्रे "सकाळ'च्या प्रतिनिधीकडे उपलब्ध असून या कागदपत्रांवर संबंधित त्रिकुटाने स्वाक्षऱ्या केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मरीन लाईन्स येथे लक्ष्मीसदन नावाची इमारत आहे. या इमारतीतील फ्लॅटच्या बदल्यात याच परिसरात सदनिका देण्यासाठी जागाच अस्तित्वात नसल्याने, मुंबईत अन्यत्र सदनिका दिल्या जातील, असे सांगण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे 1972 पासून हे प्रकरण म्हाडात प्रलंबित आहे; तर 2018 मध्ये संबंधित व्यक्तीचे नाव मास्टर लिस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. 48 वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही सदनिका नावावर होत नसल्याने, 2018 मध्ये या व्यक्तीने म्हाडाला स्वतःहून अर्ज करत, दादर परिसरात गणेश भुवन इमारतीतील दोन सदनिका राखीव ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार 4 आणि 12 वा मजला राखीव असल्याचे म्हाडाने त्यांना कळविलेही होते. या मास्टरलिस्टच्या यादीवर ऑक्‍टोबर 2019 मध्ये म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी स्वाक्षरीही केली आहे; परंतु महेश देशपांडे, कविता गुरव आणि श्रद्धा कुटप्पन या त्रिकुटाने संगनमत करत दादर मधील 4 थ्या मजल्यावरील सदनिका कामाठीपुरातील गोलाईत नावाच्या व्यक्तीला दिली. यासाठी त्यांना चांगला आर्थिक फायदा झाल्याची चर्चाही म्हाडा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. 

"आर्थिक लाभा'साठी बदलीही रोखली 
कविता गुरव यांची तीन महिन्यांपूर्वी बदली झाली होती. ती बदलीही या कामांसाठी त्यांनी दबावतंत्राचा वापर करत रोखून ठेवल्याचे कर्मचारी खासगीत सांगतात. दरम्यान, रिपेअर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून म्हाडाच्या दक्षता (व्हिजिलन्स) विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. संबंधित त्रिकुटाची विभागीय चौकशी सुरू असून चूक लपविण्यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सदर प्रकरणाची माहिती कळली आहे. संबंधित तक्रारदार आणि अधिकाऱ्यांकडून यासंदर्भातील कागदपत्रे मागविली असून, मास्टर लिस्ट गैरव्यवहार प्रकरणासोबतच या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. यात कर्मचारी दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. 
- सतीश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा 

तक्रारदाराने याबाबतची तक्रार दक्षता विभागाकडे सादर करावी. विभागामार्फत प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच कर्मचाऱ्यांवरील कारवाईबाबतची शिफारस म्हाडा उपाध्यक्षांना कळविण्यात येईल. 
- संजीव वर्मा, प्रमुख, दक्षता विभाग, म्हाडा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com