कोरोना काळात श्वसन आरोग्यात झाली सुधारणा, कमी प्रदूषणामुळे ओझोनच्या प्रमाणात 17 टक्के वाढ

भाग्यश्री भुवड
Monday, 14 September 2020

वायू प्रदूषण हा भारतातील नेहमीचाच सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याला खूप मोठा धोका उत्पन्न होतो आणि अकाली मृत्यूच्या घटनाही घडतात.

मुंबई : वायू प्रदूषण हा भारतातील नेहमीचाच सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याला खूप मोठा धोका उत्पन्न होतो आणि अकाली मृत्यूच्या घटनाही घडतात. श्वसनाच्या आरोग्याची काळजी घेत असताना हवा किती स्वच्छ आहे, हे विचारात घेतले पाहिजे. हवेतील तरंगते कण हे प्रदूषणाला सर्वात जास्त कारणीभूत असतात. प्रामुख्याने वाहने, निवासी वस्त्या, ऊर्जेचे उत्सर्जन, औद्योगिक उत्सर्जन आणि धूळ यांच्यातून हे तरंगते कण निर्माण होतात. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील सुमारे 91 टक्के लोक अशा भागात राहतात, जेथे हवेची गुणवत्ता इष्ट पातळीपेक्षा कमी दर्जाची असते. मार्च महिन्यापासून भारतात उद्रेक झालेल्या कोरोना साथीच्या नंतर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे सरकारने या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे औद्योगिक आणि वैयक्तिक पातळीवरील अनेक कारभार ठप्प झाले. या काळात भारतातील घातक घटकांच्या उत्सर्जनाची पातळी लक्षणीय प्रमाणात कमी झाली. साहजिकच हवेचा दर्जा आणि एकूणच लोकांच्या श्वसनाचे आरोग्य सुधारले.

महत्त्वाची बातमी - आदित्य ठाकरेंचं उठणं-बसणं मुव्ही माफिया आणि सुशांतच्या खुन्यांसोबत, कंगनाने पहिल्यांदाच थेट नाव घेत केलं ट्विट

एल्सेव्हियरच्या अभ्यासानुसार, टाळेबंदीच्या कालावधीत पार्टिक्युलेट मॅटर 2.5 (पीएम 2.5), पीएम 10, कार्बन मोनोक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड यांच्या प्रमाणात एकूण 43% , 31%, 10% आणि 18 टक्के अशी घट होत गेली, तर ओझोनच्या प्रमाणात 17% वाढ झाली. सल्फर डायऑक्साईडच्या प्रमाणात नगण्य घट झाली.

प्रदूषणाच्या पातळीत होणारी ही घसरण श्वासोच्छवासाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यास उपयुक्त ठरते, तसेच वायू प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या मृत्युंची जोखीमही कमी करते. या संदर्भात कोरोनाच्या साथीचा विचार केला, तर टाळेबंदीच्या काळात वायू प्रदूषण कमी होऊन हवेचा दर्जा उत्तम झाल्याने अनेक व्यक्तींमध्ये श्वासोश्वासाच्या समस्या कमी झाल्या आणि परिणामी त्यांची कोरोनाच्या संसर्गाची शक्यता कमी झाली.

"ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता फारशी सुधारली नाही, अशा ठिकाणी व्यक्तींच्या आरोग्याची गुंतागुंत वाढते आणि त्यांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. टाळेबंदीमुळे वाहनांची रहदारी थांबली, उद्योग बंद झाले व बांधकामेही ठप्प झाली. पेट्रोल-डिझेलच्या ज्वलनामुळे होणार प्रदूषण खूप कमी झाले. त्यामुळे देशाच्या अनेक भागांतील नागरिकांच्या श्वसनाच्या आरोग्यामध्ये किंचित सुधारणा झाली. अन्यथा, वाहतूक व उद्योग यांच्यामुळे मागील दोन दशकांत हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीचे रोग, फुफ्फुसाचे तीव्र आजार, जंतूसंसर्ग, दमा आणि अस्थमा यांचे प्रमाण वाढतच चालले होते" असं अपोलो रुग्णालयाचे फुफ्फुस विकार विभाग सल्लागार डॉ. जयलक्ष्मी टी. के म्हणालात.  

महत्त्वाची बातमी - सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी FIR का दाखल केला नाही? अनिल देशमुखांनी केला 'मोठा' खुलासा

प्रदूषण करणाऱ्या घटकांचे प्रमाण उच्च असेल, तर माणसांना श्वसनाचे आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार होतात आणि अशा वेळी कोरोनासारख्या वायूजन्य रोगांविरूद्ध लढण्याची शरिराची प्रतिकारशक्ती कमी होते. 

टाळेबंदीमुळे हवेचे प्रदूषण कमी झाले, वातावरण सुधारले व आजारांचे प्रमाण कमी झाले असले, तरीही परिस्थिती तात्पुरती आहे. टाळेबंदी शिथिल होऊ लागल्यावर, सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होऊ लागल्यावर प्रदूषणामुळे उद्भवणारे श्वसनाचे आणि हृदयाचे आजारही पुन्हा पूर्वीसारखे डोके वर काढतील. अनेक निर्बंध सध्या उठवण्यात आलेले आहेत या परिस्थितीत आजारांचे कमी झालेले प्रमाण पुन्हा वाढू शकते.

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याची जगाची धडपड सुरू आहे. वायू प्रदूषण वाढल्यास ही धडपड व्यर्थ ठरू शकते. कोरोनावर मात करण्यात आतापर्यंत जे काही मर्यादीत यश मिळाले आहे, बाधित रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यात जी थोडीफार प्रगती झाली आहे, तिला या वायू प्रदूषणामुळे धक्का लागू शकतो. त्यामुळेच पर्यावरण व आरोग्यसेवा या दोन्ही गोष्टींचे संतुलन राखून प्रभावी उपाययोजना झाल्यास, हवेची व आरोग्याचीही गुणवत्ता वाढेल आणि कोरोनाच्या संकटापासून हळूहळू मुक्त होता येईल असे मत डॉ.जयलक्ष्मी टी. के यांनी व्यक्त केले.

( संपादन - सुमित बागुल ) 

respiratory health improved during covid period ozone layer has improved by seventeen percent


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: respiratory health improved during covid period ozone layer has improved by seventeen percent