काँग्रेसचा सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीनेच लढणार असल्याचे निश्‍चित झालेले असले तरी कॉंग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा सुरू केल्याने राष्ट्रवादीचे नेते अचंबित झाल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांत लोकसभेच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्‍चित झालेले नाही. 

अहमदनगर, पुणे, यवतमाळ, औरंगाबाद या चार मतदारसंघांच्या अदलाबदलीच्या प्रस्तावाला दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांची अद्याप सहमती मिळालेली नाही. शुक्रवारी कॉंग्रेसने विदर्भातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी यवतमाळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडण्यास स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले; तर अहमदनगर या राष्ट्रवादीकडील लोकसभा मतदारसंघावर कॉंग्रेसने दावा करण्याची तयारी केली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून घ्यावा यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत, तर राष्ट्रवादीला कॉंग्रेसकडील औरंगाबाद व पुणे लोकसभा मतदारसंघ हवे आहेत. 

दोन्ही पक्षांसोबत आघाडी करणाऱ्या इतर लहान पक्षांनाही काही लोकसभा मतदारसंघ सोडावे लागणार आहेत. यामध्ये पालघर, अकोला, अमरावती व हातकणंगले यांचा समावेश असल्याचे कळते. 

भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न 

कॉंग्रेसकडे पुणे व औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याचा दावा केला जात आहे, तर राष्ट्रवादीकडे अहमदनगरमध्ये सक्षम उमेदवार नसल्याचा कॉंग्रेसचा दावा आहे. त्यामुळे सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत स्थानिक नेत्यांच्या भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सुरू केला आहे. 

सलग तीन दिवस चालणाऱ्या या आढावा बैठकीत आतापर्यंत मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र व विदर्भातील मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आहे. 
 
Web Title: A review of all the Lok Sabha constituencies from Congress