समृद्धी महामार्गाच्या कामाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

मुंबई - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्‍यक असणाऱ्या "लॅंड पुलिंग'चे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. या महामार्गासाठी भूखंड पुनर्खरेदीचे दर निश्‍चित करून घ्यावेत, त्याचबरोबर जमीन मोजणीचे काम तातडीने सुरू करावे, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासंदर्भातील कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लॅंड पुलिंगचे काम तातडीने सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, की मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद,अहमदनगर, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना जोडणारा आहे. तथापि, या महामार्गासाठी ठाणे, नगर, अमरावती आणि नाशिक या जिल्ह्यांत लॅंड पुलिंगच्या कामात येत असलेले अडथळे दूर करून याबाबत त्वरित कार्यवाही सुरू करावी. याशिवाय हा समृद्धी महामार्ग हा नागरिकांच्या सोयीसाठी असल्याने लॅंड पुलिंगच्या कामात अडथळे येऊ नयेत, यासाठी या प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्वांना या प्रकल्पाची इत्यंभूत माहिती असणे आवश्‍यक आहे. जेणेकरून याबाबत स्थानिक लोक अडचणी घेऊन आल्यास त्या तक्रारींचे योग्य निरसन करता येणे शक्‍य होईल. या प्रकल्पासाठी बागायती आणि जिरायती जमीनधारकांना प्रतिहेक्‍टर किती अनुदान देता येईल, याबाबत अभ्यास करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जमीन देणाऱ्या भूधारकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक सुविधा मिळणे आवश्‍यक असून, याबाबत राज्य शासनाने नुकताच निर्णयही घेतला आहे.

Web Title: A review of the work samruddhi highway by chief minister