
रेवस-करंजा रो-रो सेवा सुरू करण्यासाठी करंजा येथील जेटी आणि टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. आता रेवस येथील या दोन्ही कामांना सुरुवात झाली आहे. एप्रिल 2021 पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास महसूल आणि बंदरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी (ता.28) व्यक्त केला.
अलिबाग : रेवस-करंजा रो-रो सेवा सुरू करण्यासाठी करंजा येथील जेटी आणि टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. आता रेवस येथील या दोन्ही कामांना सुरुवात झाली आहे. त्यांना गती देण्यासाठी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. एप्रिल 2021 पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास महसूल आणि बंदरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी (ता.28) व्यक्त केला.
रेवस येथील जेट्टीच्या कामाची पाहणी करण्याबरोबरच जिल्ह्यातील चक्री वादळ आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेण्यासाठी सत्तार यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
हे वाचा : लोकल सुरू होण्यासाठी पॉझिटीव्ही चिन्ह
चक्री वादळातील नुकसानग्रस्तांसह शेतकऱ्यांना मदतीचा हात राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. परतीच्या पावसामुळेदेखील शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यावर तातडीने शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. यावेळी दहा हजार प्रति हेक्टर भरपाई देण्यात येणार आहे. खारजमिनीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. जुने बंधारे फुटून जाऊन खारजमीन नापिक झाली आहे. खारेपाटातील शेतकऱ्यांचे नुकसान भविष्यात होणार याकडे पुढच्या काही महिन्यांत लक्ष देऊन विशेष निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे सत्तार यांनी सांगितले.
या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, आमदार महेंद्र दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, शिवसेनेचे संतोष निगडे, राजा केणी आदी उपस्थित होते.
हे वाचा : शितल भानुशाली यांच्या मृत्यूचे गुढ वाढले
मच्छीमारांवर अन्याय होणार नाही
रेवस बंदराचा विकास करीत असताना, येथील मच्छीमारांवर अन्याय होणार नाही. याकडे प्राधान्याने पाहिले जाणार आहे. रो-रो सेवा सुरू करताना मच्छीमारांच्या बोटींना कोणताही धोका निर्माण होणार नाही, याकडेही लक्ष देण्यात आले आहे, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.