रेवस - करंजा रो-रो सेवेला पुढील वर्षाचा मुहूर्त; जेटीच्या कामाला वेगाने सुरुवात

प्रमाेद जाधव
Wednesday, 7 October 2020

पर्यटनस्थळ आणि रायगड जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या अलिबागमध्ये जाण्यासाठी उरण, नवी मुंबई, पनवेल, येथील नागरिकांना मुंबई - गोवा महामार्ग हा प्रमुख मार्ग आहे; परंतु तो अधिक वेळ आणि पैसा खर्च करणारा आहे. सध्या प्रवासासाठी अडीच ते तीन तास लागतात. त्यात खड्डे रस्ते व वाहतूक कोंडीमुळे प्रवास नकोसा होतो. यासाठी करंजा ते रेवस रो - रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.

अलिबाग  : मांडवा ते भाऊचा धक्का ही रो-रो सेवा यशस्वी झाल्यानंतर या वाहतूक सेवेतील पुढचे पाऊल म्हणून रेवस - करंजा (उरण) रो-रो सेवा सुरू करण्यासाठी रेवस येथील जेट्टी आणि टर्मिनलचे काम ऑक्‍टोबरपासून पुन्हा वेगाने सुरू करण्यात आले आहे. सागरमाला योजनेतून सुमारे 50 कोटी रुपयांचा यासाठी खर्च करण्यात येत आहे. प्रकल्पाचे काम निम्मे झाले आहे. नोव्हेंबर 2021 पर्यंत ते पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई - अलिबाग हा प्रवास वेळ आणि पैसे वाचवणारा ठरणार आहे. 

आनंदाची बातमी : रेवस - रेडी महामार्ग दृष्टीक्षेपात 

पर्यटनस्थळ आणि रायगड जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या अलिबागमध्ये जाण्यासाठी उरण, नवी मुंबई, पनवेल, येथील नागरिकांना मुंबई - गोवा महामार्ग हा प्रमुख मार्ग आहे; परंतु तो अधिक वेळ आणि पैसा खर्च करणारा आहे. सध्या प्रवासासाठी अडीच ते तीन तास लागतात. त्यात खड्डे रस्ते व वाहतूक कोंडीमुळे प्रवास नकोसा होतो. यासाठी करंजा ते रेवस रो - रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. सागरमाला योजनेअंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येक 50 टक्के निधी देण्यात येत आहे. 

धक्कादायक : चोरीसाठी आला अन्‌ जखमी झाला

रेवस येथील जेटी, टर्मिनल इमारत, रस्ता याचे काम गेल्या वर्षी 2019 मध्येच सुरू झाले होते; परंतु काही तांत्रिक बाबींमुळे ते थांबले होते. त्यात लॉकडाऊन असल्याने लांबणीवर गेले. 22 सप्टेंबर 2020 रोजी या कामाला पुन्हा मान्यता मिळाली आहे. त्यानंतर 1 ऑक्‍टोबरपासून रेवस येथील कामांना सुरुवात करण्यात आली आहे. 
रेवस येथील जेटीचे काम आठ महिन्यांत तर टर्मिनल एक वर्षात पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 2021 मध्ये दिवाळीनंतर रेवस - करंजा येथील रो - रो सेवा सुरू होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

करंजा येथील स्थिती 
- करंजा येथील जेटी, रस्ता, मच्छीमारांसाठी वेगळी जेटी, पार्किंग आणि अन्य इमारतीचे काम मे 2019 मध्ये पूर्ण झाले आहे. 
- करंजा जेटीसाठी 20 कोटी रुपयांचे खर्च करण्यात आला आहे. 

रेवस येथील स्थिती 
- रेवस येथील जेटी आणि अद्ययावत टर्मिनल इमारतीसाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये बुकिंग सेंटर, कॅन्टीन, प्रतीक्षालय व अन्य सुविधा प्रवाशांसाठी असणार आहेत. 
 
पाऊण तासात अलिबागला 
करंजा - रेवस रो - रो सेवेमुळे उरण अलिबागला जोडले जाणार आहे. या सेवेमुळे करंजाहून अवघ्या 15 मिनिटात रेवस बंदरात पोहचता येणार आहे; तर अवघ्या एक ते पाऊण तासात अलिबागला पोहचता येणार आहे. 

उरण, नवी मुंबई व मुंबई येथील नागरिकांना अलिबागला पोहचता यावे, यासाठी रेवस - करंजा रो - रो सेवा सुरू करण्याचा आमदार असताना सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नांना आता यश आले आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. 
- पंडित पाटील, माजी आमदार, अलिबाग 
------------------------------------- 
अलिबाग - रेवस रस्ता चांगल्या स्थितीत आहे. करंजा - रेवस रो - रो सेवेमुळे अलिबाग - नवी मुंबई अंतर अगदी जवळ येणार आहे. या सेवेमुळे थेट नवी मुंबईत जाता येणार आहे. 
- किशोर अनुभवणे, प्रवासी 

(संपादन : नीलेश पाटील )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rewas-Karanja Ro-Ro service will start next year