मुंबई पोलिस भरतीत यंदा 'आरएफआयडी'चा वापर

- मंगेश सौंदाळकर
रविवार, 5 मार्च 2017

मुंबई - पोलिस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीतील वेळेचा अपव्य टाळण्यासाठी "आरएफआयडी टॅग' वापरण्यात येणार आहे. या टॅगमुळे उमेदवाराने किती वेळेत अंतर पार केले, याची अचूक माहिती मिळेल.

मुंबई - पोलिस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीतील वेळेचा अपव्य टाळण्यासाठी "आरएफआयडी टॅग' वापरण्यात येणार आहे. या टॅगमुळे उमेदवाराने किती वेळेत अंतर पार केले, याची अचूक माहिती मिळेल.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या 2015च्या अहवालानुसार राज्यातील पोलिसांची संख्या (पोलिस महासंचालक ते पोलिस शिपाई) एक लाख 99 हजार 939 एवढी आहे. 2015च्या लोकसंख्या अहवालानुसार राज्यात एक लाख लोकसंख्येसाठी 168 पोलिस असे प्रमाण होते. मुंबई पोलिस दलातून निवृत्त होणाऱ्या पोलिसांची संख्याही अधिक आहे. रिक्तपदे भरण्यासाठी पोलिस शिपायांची पदे भरण्यावर मुंबई पोलिस दलाने भर दिला आहे. यंदा एक हजार 717 पोलिस शिपायांची भरती करण्यात येणार आहे.

मुंबई पोलिस दलाची भरतीप्रक्रिया तीन टप्प्यांत होते. प्राथमिक चाचणीतील पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाते. शहरातील जागेची अडचण असल्याने द्रुतगती महामार्गानजीकच्या सर्व्हिस रोडवर उमेदवारांची धावण्याची चाचणी घेतली जाते. हजारो उमेदवारांची चाचणी घेताना अधिकाऱ्यांची दमछाक होते. शिवाय या प्रक्रियेसाठी खूप वेळ लागतो. तो वाचविण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन (आरएफआयडी) या उपकरणाच्या टॅगचा वापर करण्यात येणार आहे.
या टॅगमुळे दिवसाला पाच हजार उमेदवारांच्या धावण्याची चाचणी घेणे शक्‍य होईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार नाही, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

यंदा पोलिस भरतीच्या चाचणीत इलेक्‍ट्रॉनिक उपकरणाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होईल. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचे पेपर फुटू नयेत, याची दक्षता घेतली आहे.
- दत्ता पडसलगीकर, पोलिस आयुक्त, मुंबई

Web Title: rfid use in mumbai police recruitment