तंबाखूमुळे ठाण्यात रिक्षा अपघात ; एक ठार, चौघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

ठाणे : रिक्षा चालवताना हातातून खाली पडलेली तंबाखूची पुडी उचलताना रिक्षावरचा ताबा सुटून झालेल्या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यात घडली. यात रिक्षाचालकासह चौघे जखमी झाले. साकेत रोडवर ही दुर्घटना घडली. 

ठाणे : रिक्षा चालवताना हातातून खाली पडलेली तंबाखूची पुडी उचलताना रिक्षावरचा ताबा सुटून झालेल्या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यात घडली. यात रिक्षाचालकासह चौघे जखमी झाले. साकेत रोडवर ही दुर्घटना घडली. 

मुझफ्फर बेग (वय 23, रा. क्रांतीनगर, राबोडी) हा रिक्षाचालक सिडको बस स्टॅण्ड ते काल्हेर-भिवंडी या मार्गावर रिक्षा चालवतो. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सिडको रिक्षा स्टॅण्ड येथून त्याच्या रिक्षात चार प्रवासी बसले होते. काल्हेर भिवंडीकडे साकेत रोडने जात असताना बेग याने धावत्या रिक्षामध्ये तंबाखू खाण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याची तंबाखूची पुडी रस्त्यावर पडली. ती उचलण्याच्या प्रयत्नात त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्याकडेच्या झाडावर आदळून भीषण अपघात घडला. या अपघातात रिक्षातील प्रवासी सखाराम सीताराम बावळेकर (41, रा. घाटकोपर) यांच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. 

रिक्षातील अन्य प्रवासी पूजा जाधव (27, रा. पूर्णा गाव, भिवंडी), संतोष गौतम (32, रा. काल्हेर, भिवंडी) आणि राजेंद्र अहिरे (52, रा. गणेशवाडी, ठाणे) हे जखमी झालेत. या अपघातात रिक्षाचालक बेग हादेखील जखमी झाला. सर्व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Rickshaw accident in Thane due to tobacco use One killed four injured