रिक्षा, फेरीवाल्यांना बसलाय कोट्यवधींचा फटका!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

‘जनता कर्फ्यू’मुळे मुंबईतील सुमारे दोन लाख रिक्षाचालकांचे १५ कोटी रुपयांचे; तर तेवढ्याच फेरीवाल्यांचे सुमारे ६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शहरातील आठ हजार हॉटेलचालकांनाही आज सक्तीची विश्रांती घ्यावी लागली.

मुंबई : ‘जनता कर्फ्यू’मुळे मुंबईतील सुमारे दोन लाख रिक्षाचालकांचे १५ कोटी रुपयांचे; तर तेवढ्याच फेरीवाल्यांचे सुमारे ६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शहरातील आठ हजार हॉटेलचालकांनाही आज सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. अर्थात या सर्वांना गेले काही दिवस मंदीमुळे उत्पन्न घटल्याचा अनुभव येतच होता; मात्र आज सर्वत्र संचारबंदी असल्याने रिक्षा रस्त्यावर आल्याच नाहीत, तर हॉटेलही उघडली नाहीत.

ही बातमी वाचली का? आदेश धुडकावून त्यांनी लावलं लग्न! पुढे काय झालं वाचा तुम्हीच... 

मुंबईतील रिक्षाचालकांचा रोज सुमारे हजार-बाराशे रुपयांचा धंदा होतो असे गृहित धरले तरी त्यातून इंधन, देखभाल, कर्जाचा हप्ता, मालकाला द्यायचे भाडे आदी खर्च वगळून त्यांना रोज सरासरी ५०० ते ७०० रुपये उत्पन्न मिळते. मुंबईत सुमारे दोन लाख रिक्षाचालक असून, कर्जाने रिक्षा घेतलेल्यांना दरमहा किमान पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागतो. मालकाला रोज किमान अडीचशे रुपये भाडे द्यावे लागते. उद्यापासून रेल्वे बंद असल्याने व बेस्ट बसचा वापर केवळ अत्यावश्‍यक सेवांसाठीच होणार असल्याने लोकांना खऱ्या अर्थाने सार्वजनिक वाहतुकीसाठी केवळ रिक्षाच उपलब्ध राहणार आहेत; पण प्रवासीच कमी झाले आहेत. त्यामुळे उद्यापासून काय परिस्थिती राहील तेही पाहावे लागेल. सुमारे दोन ते अडीच लाख फेरीवाले आहेत. यांची रोजची उलाढाल शंभर ते सव्वाशे कोटी रुपये असून, त्यांचे रोजचे उत्पन्न प्रत्येकी अंदाजे तीन ते चार हजार रुपये आहे, असे कामगार नेते शशांक राव यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

ही बातमी वाचली का? नमाजासाठी जमलेल्या 600 हून नागरिकांवर गुन्हा

मुंबईत सुमारे साडेदहा हजार हॉटेल असून, त्यातील आठ हजार हॉटेलमालक आहार या संघटनेचे सदस्य आहेत. राज्यातील हॉटेलचालकांच्या ६५ संघटना आहाराला संलग्न आहेत. शहरातील हॉटेलचालकांना गेले काही दिवस सुरक्षित अंतर ठेवून कमी ग्राहक घेण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे निम्मा धंदा कमी झाला होता, बार तर बंदच आहेत. त्यातच हॉटेलातील ग्राहकही कमी झाले. कर्मचारीही गावी गेले आहेत. पार्सलची संख्याही कमी झाली. त्यामुळे सध्या हॉटेलांचे तसेही वाईट दिवस आले आहेत; मात्र नुकसान किती झाले हे सांगण्याची ही वेळ नाही. हॉटेलचालकांचे रोजचे सरासरी उत्पन्न २५ हजार ते ५० हजारांच्या आसपास असते. त्यामुळे हॉटेल व्यवसायालाही किमान ५० कोटी रुपयांचा फटका बसला असावा. आता एकजुटीने सरकारचे नियम पाळले पाहिजेत.
- शिवानंद शेट्टी, अध्यक्ष, आहार हॉटेलचालक संघटना
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw, hawkers get hit by billions due to corona!