बघा शांततेचं महत्त्व... फ्लेमिंगोंनी बहरले खाडी किनारे!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

परदेशी पाहुणे असलेले फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी आवर्जून नवी मुंबई आणि उरण, ठाणे, वसई आदी परिरात विसावतात. यंदाही ते आले आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे असलेली शांतता त्यांच्या पथ्यावर पडली आहे.

मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्वांना घरीच बंदिस्त व्हावं लागलं आहे आणि बाहेर मोकळा श्वास घेत असलेला निसर्ग रोजच आपले नवनवे रंग  उधळत आहे. सारं काही शांत निवांत झालं असल्याने प्रामुख्याने पक्ष्यांचा विहार मन मोहवून टाकला आहे. काँक्रीटच्या वेढ्यात गुरफटलेल्या नवी मुंबईला परिसराला काही प्रमाणात निसर्गाची देणगी लाभली आहे. परदेशी पाहुणे असलेले फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी आवर्जून नवी मुंबई आणि उरण, ठाणे, वसई आदी परिरात विसावतात. यंदाही ते आले आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे असलेली शांतता त्यांच्या पथ्यावर पडली आहे. नेहमीपेक्षा जरा जास्तच संख्येने त्यांचा स्वच्छंद विहार खाडीकिनारी सुरू आहे. 

हे वाचलं का? : माझं पिल्लू देवाघरी गेलं... श्वानाच्या मृत्यूने `आई`चे अश्रू थांबेना!

दरवर्षी एप्रिल-मेमध्ये नवी मुंबई परिसरात फ्लेमिंगो दाखल होतात. नवी मुंबई, उरण, ठाणे, पाणजू बेट, वसई आदी परिसरात दाखल झाले आहेत. सारा परिसर फ्लेमिंगोंनी फुलून गेला आहे. लॉकडाऊनमुळे खाडीचे पाणीही स्वच्छ आहे. फ्लेंमिंगोचे आवडते खाद्य असलेली एल्गी (algae) वनस्पतीही चांगली उगवली आहे. पाणी निर्मळआहे. हवा स्वच्छ आहे. त्याचा आनंद फ्लेमिंगो घेत आहेत, असे जंगल आधिकारी सांगतात. वसई - उत्तन खाडीत पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या मच्छीमारांनी प्रथमच आपण पाणजू खाडीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुलाबी पक्षी पाहिले असल्याचे सांगितले. दरम्यान, फ्लेमिंगोंचे आगमन झालेल्या ठिकाणी वनाधिकाऱ्यांनी आता सुरक्षा वाढवली आहे. 

नक्की वाचा : #Lockdown : फॅशनेबल दाढी असलेल्यांचे वांदे

लॉकडाऊनमुळे अनेक परिसर मोकळे आहेत. फ्लेमिंगो सहवासात राहणे पसंत करतात. ते नेहमी मोठ्या संख्येनेच प्रवास करतात. त्यांना मुक्कामात कसलाही त्रास नको असतो. अशा काही गोष्टींकडे अभ्यासकांनी लक्ष वेधले. लॉकडाऊनचा कालावधी एक प्रकारे फ्लेमिंगोंचा अभ्यास करण्यासाठी योग्य आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी फायदाच होईल, असेही त्यांनी सांगितले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फ्लेमिंगो वाढले
नवी मुंबई आणि पाणजू खाडीत फ्लेमिंगोंचे प्रमाण वाढले आहे, पण त्याचे कारण उरणमधील खाडीतील पाणी कमी झाले असल्याचेही काहींचे मत आहे. काहींच्या मते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील फ्लेमिंगोंचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात आहे. 25 टक्क्यांनी ते वाढल्याचे सांगितले जात आहे. यंदा दीड लाख फ्लेमिंगो आले असल्याचा अंदाज आहे. नवी मुंबईत दरवर्षी सहा हजार फ्लेमिंगो येतात. ही संख्या यंदा साडेआठ हजार असल्याचेही सांगितले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rise in the number of flamingo especially in navi mumbai, uran, mumbai, thane and vasai... Because of the silence in the lockdown