टीटीसी एमआयडीसीतील रस्त्यांचे काम प्रगतिपथावर

टीटीसी एमआयडीसीतील रस्त्यांचे काम प्रगतिपथावर
टीटीसी एमआयडीसीतील रस्त्यांचे काम प्रगतिपथावर

नवी मुंबई : एमआयडीसीमधील रस्त्यांकडे नवी मुंबई महापालिका दुर्लक्ष करत संथगतीने काम करत असल्यामुळे एमआयडीसीने उद्योजकांच्या मागणीवरून रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयडीसीतील रबाळे, खैरणे येथील अंतर्गत असणाऱ्या 22 कि.मी. रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासह पथदिवे, गटार बांधणे यांचे काम करण्यात येणार आहे. यासाठी एमआयडीसीकडून 231 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही कामे प्रगतिपथावर असून डिसेंबर अखेरपर्यंत कामे पूर्ण होणार असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, त्यामुळे कामगारांना दिलासा मिळणार आहे. 

ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा औद्योगिक पट्टा आहे. या ठिकाणचे रस्ते हे 2004 मध्ये नवी मुंबई महापालिकेकडे एमआयडीसीने हस्तांतरित केले; मात्र या ठिकाणच्या रस्त्यांसह सोयी-सुविधांकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण झाली असून, रात्रीच्या वेळी पथदिवेदेखील बंद असतात. त्यामुळे येथील कामगारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एमआयडीसीतील लघुउद्योजक संघटनांनी नवी मुंबई महापालिकेडे रस्तेदुरुस्ती तसेच कॉंक्रिटीकरण करावे, यासाठी वारंवार मागणी केली होती; मात्र पालिकेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योजकांकडून मागणी करण्यात आल्यानंतर एमआयडीसीने लघुउद्योजकांच्या सहकार्याने या ठिकाणचे रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रबाळे एमआयडीसीतील एमटीएनएल रोड, भूषण हॉटेलसमोरील, सेंट्रल रोड, गावदेवी मंदिर रोड, फायर स्टेशन रोड याव्यतिरिक्त रबाळे एमआयडीसीमध्ये असणारे 22 कि.मी.चे सर्व रस्ते व खैरणे येथील ए ब्लॉकमध्ये असणाऱ्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी येणाऱ्या एकूण 231 कोटी रुपये खर्चातून रस्ता कॉंक्रिटीकरण, पथदिवे, गटारबांधणीसाठी खर्च होणार आहे. यापैकी 100 कोटी रुपये एमआयडीसी खर्च करणार असून, उर्वरित खर्च हा लघुउद्योजकांकडून 25 वर्षांच्या मुदतीवर सेवा कराच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार आहे, असेही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
नवी मुंबई महापालिका औद्योगिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या रस्त्याकडे दुर्लक्ष करत होती. त्यामुळे लघुउद्योजकांनी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार रस्ते दुरुस्ती करण्याचे ठरवले आहे. रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केल्यानंतर नवी मुंबई महापालिकेकडे हे रस्ते हस्तांतरित करण्यात येणार आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. 
- एम. एस. कलकुटकी, कार्यकारी अंभियता, एमआयडीसी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com