पोलिसांत भरती करण्यासाठी 1 लाख रुपयाची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

नवी मुंबई  - नवी मुंबई पोलिस भरतीत सहभागी झालेल्या व प्रतीक्षा यादीत असलेल्या तीन महिला उमेदवारांना अज्ञात व्यक्तीने संपर्क साधून निवड करण्यासाठी त्यांच्याकडे प्रत्येकी एक लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारे रोख रकमेची मागणी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. 

या घटनेतील तक्रारदार तरुणी पुणे जिह्यातील जुन्नर भागातील आहे. ती फेब्रुवारी 2018 मध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाकडून घेण्यात आलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत सहभागी झाली होती. यादी 161 गुणांवर बंद करण्यात आली होती. तरुणीला 158 गुण असल्याने तिला खुल्या प्रवर्गामध्ये तिसऱ्या क्रमांकावर वेटिंग लिस्टला ठेवण्यात आले. यादरम्यान 10 मे रोजी अविनाश ढामसे नामक अज्ञात व्यक्तीने सदर तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधून तिच्याकडून नवी मुंबईच्या पोलिस भरतीतील वेटिंग लिस्टबाबत माहिती जाणून घेत निवड व्हायची असल्यास एक लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले; मात्र या तरुणीने पैसे देण्यास नकार दिला. 

तिच्यासह अन्य दोन तरुणींनाही अशाच प्रकारे एक लाख रुपयांची ऑफर दिली होती. त्यांनी हा प्रकार नवी मुंबईचे पोलिस आयुक्‍त हेमंत नगराळे यांना सांगितला. त्यानंतर नगराळे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आला. या तपासाला सुरुवात करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

भरती प्रक्रियेलाच गालबोट 
पोलिस भरतीत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी विशेष काळजी घेतली होती; मात्र या भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांकडे पोलिस भरतीत निवडीसाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने नवी मुंबई पोलिसांच्या भरती प्रक्रियेलाच गालबोट लागले आहे.

Web Title: Rs 1 lakh demand for police recruitment