सायन-दादर प्रवासासाठी 6000 रुपये! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

प्रवाशांना धमकावून लुटणारा टॅक्‍सीचालक जेरबंद 

मुंबई : परराज्यांतून आलेल्या दोन प्रवाशांना सायनहून दादरला नेण्यासाठी टॅक्‍सीचालक व त्याच्या साथीदाराने धमकावून प्रत्येकी 3000 रुपयांना लुटले होते. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी फकिरा ठाकरे व गणेश स्वामी या आरोपींना 27 तासांत अटक केली. 

हे ही वाचा....या कार्यक्रमामुळे कर्करोगग्रस्तांमध्ये निर्माण झाली जगण्याची आशा 

गणपत रेवा राम (21) अणि त्यांचा आतेभाऊ विजयवाडा येथून खासगी आरामबसने मुंबईतील सायन येथे उतरले. त्यांनी तेथून दादर रेल्वेस्थानकापर्यंत जाण्यासाठी टॅक्‍सी केली. टॅक्‍सीचालकाने प्रवासाचे 100 रुपये आणि सामानाचे 30 रुपये असे भाडे सांगितले. काही अंतर गेल्यावर चालकाने एका साथीदाराला टॅक्‍सीत घेतले. त्यांनी या दोन प्रवाशांना सायन आणि दादर परिसरात फिरवून दादर स्थानकाकडे न नेता एल्फिन्स्टन पुलाच्या पश्‍चिमेला नेले. 

ही बाब गणपत राम यांच्या लक्षात आली. त्यांनी चालकाला टॅक्‍सी बाजूला घेण्यास सांगितले आणि दोघांनी उतरण्याचा प्रयत्न केला; परंतु दरवाजा आतून बंद करण्यात आला होता. 

हे ही वाचा....लज्जास्पद!चाईल्ड पोर्नोग्राफीत महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमाकांवर 

टॅक्‍सीचालक आणि त्याच्या साथीदाराने गणपत व त्यांच्या आतेभावाकडे 3000 रुपयांची मागणी केली. त्यांनी टॅक्‍सीतून उतरण्याचा प्रयत्न केला असता, टॅक्‍सीचालकाने प्रत्येकी 3000 रुपये मागितले आणि ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या दोघांनी एकूण 6000 रुपये ठाकरे आणि स्वामी यांना दिले. त्यानंतर आरोपींनी या दोघांच्या पाकिटातील 1000 रुपये काढून घेतले आणि पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी सीसी टीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने टॅक्‍सीचा क्रमांक मिळवला आणि 27 तासांत दोघा आरोपींना अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rs 6000 for Sion-Dadar Travel! Taxi driver jailed for threatening passenger