रविवारची सुटी रांगेतच! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नवी मुंबई - सलग चौथ्या दिवशीही शहरातील कानाकोपऱ्यांतील बॅंकांच्या शाखा व एटीएमबाहेर रांगाच रांगा लागल्याचे दृश्‍य होते. हजारो नवी मुंबईकरांची आजची रविवारची सुटी रांगेतच गेली. त्यातही अनेक जणांना बॅंकेतील रक्‍कम संपल्यामुळे रिकाम्या हाताने परतावे लागले, तर प्रत्येक व्यक्तीला चार हजार रुपये देण्याच्या नियमाचा फायदा घेण्यासाठी रविवारच्या सुटीच्या मुहूर्त साधत कुटुंबातील आबालवृद्ध रांगेत उभे राहिले होते. 

नागरिकांना दिलासा देण्यासाठी शनिवार व रविवारी बॅंका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सुटीचा फायदा घेत शनिवारी पहाटेपासून ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. काल पैसै न मिळालेल्या काही जणांनी आज पुन्हा रांगेत राहण्यासाठी धावपळ केली. त्यात चाकरमानीही घरी असल्यामुळे बॅंका व एटीएम केंद्रांकडे धावले. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी बॅंकांबाहेरचा परिसर नागरिकांनी फुलून गेला होता. दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काही भागात एटीएम सुरू झाल्याने रक्कम काढण्यासाठी नागरिकांच्या एटीएमबाहेर रांगा लागल्या होत्या. मात्र, एका व्यक्तीला एका वेळेला फक्त दोन हजार रुपयेच एटीएममधून बाहेर येत असल्याने अनेकांनी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही रांगेत उभे करून जास्तीत जास्त पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यासोबत बॅंकेत आजही प्रत्येकाला चार हजार रुपयेच काढता येत असल्याने सुट्या पैशांअभावी नागरिकांची फरपट झाली. सुटे पैसे नसल्याने गृहिणींना आज मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करता आला नाही. काही ठिकाणी नेहमीच्या गिऱ्हाईकांना भाजीपाला विक्रेते, चिकन व मटन विक्रेत्यांनी उधारीवर वस्तू दिल्या. 

बॅंक कर्मचाऱ्यांची दमछाक 

आज सुटीचा दिवस असल्यामुळे बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. नोटा बदलण्यासोबतच पैशांचा भरणा करणाऱ्यांची संख्या आजही जास्त असल्याने बॅंक कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. दुपारनंतर काही बॅंकांमध्ये रक्कम संपल्याने पुन्हा रकमेची तरतूद करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धावाधाव करावी लागत होती. 

बॅंक कर्मचाऱ्यांच्या सुट्यांवर पाणी 

केंद्र सरकारने नोटा बदलण्यासाठी शनिवार व रविवार सुट्यांच्या दिवशीसुद्धा बॅंका सुरू ठेवण्याचे घोषित केल्याने बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागोपाठ आलेल्या हक्कांच्या सुट्ट्यांवर पाणी सोडावे लागले. त्याउलट गेल्या चार दिवसांपासून बॅंकांमध्ये नोटा बदलणे व रकमांचा भरणा करण्याच्या गर्दीने हैराण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कामाचा ताण दिसून येत होता. क्षुल्लक कारणांवरून ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडत होते.

Web Title: rush at bank