
Mumbai News: हिशेब न लागल्यास दंडात्मक कारवाई, एसटी वाहकांना निष्काळजी भोवणार
Mumbai News- एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान वाहकाने ‘ईटीआयएम’ मशीनमधील चुकीचे बटण दाबल्यामुळे तिकिटांच्या महसुलाच्या हिशेबाचा ताळमेळ जुळत नाही. या प्रकारावर यापूर्वी स्थानिक पातळीवर कारवाई केली जात होती.
शिवाय वसुलीही केली जायची; मात्र आता एसटीच्या वाहतूक विभागाने अशा निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी २०० रुपये; तर जास्तीत जास्त १००० रुपये दंडाची तरतूद केली आहे.
तशा सूचनाच देण्यात आल्या आहेत.वाहक किंवा कर्मचाऱ्यांनी ईटीआयएम मशीनमध्ये चुकीचे बटण दाबल्यास चुकीच्या नोंदी घेतल्या जातात.
त्यात दोषी आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांवर निष्काळजीचा ठपका ठेवत कमीत कमी २००; तर जास्तीत जास्त १००० रुपये दंड करण्यात यावा, अशा सूचना एसटीचे वाहतूक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी विभाग नियंत्रकांना दिले आहेत.
मार्ग तपासणीतील कारवाई (आकडेवारी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२)
भाडेवसुली करून तिकीट न देणे - ४६६
भाडे न घेता तिकीट न देणे - १६४४
कमी भाडेवसुली-२१३
जुन्या तिकिटाची पुन्हा विक्री - १०
कमी रोकड मिळणे - ६१६
जादा रोकड मिळणे - ५२८
इतर प्रकरणे - ७,०६३
एकूण प्रकरणे - १०,५४०
महसूल चोरीच्या घटना वाढतील ?
बस फेरीमध्ये वाहकांकडून तिकीट न देता पैसे घेणे, शिल्लक पैसे न देणे, तिकीट देताना कोरे तिकीट देणे आदी प्रकार सर्रास घडतात.
यावर चुका टाळण्यासाठी महामंडळाने किरकोळ दंडाची तरतूद केल्याने भविष्यात ‘१० हजारांचा अपहार करा आणि १००० दंड भरा’, असा पायंडा पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.