‘चला हवा येऊ द्या’मध्ये सचिनची तुफान फटकेबाजी

‘चला हवा येऊ द्या’मध्ये सचिनची तुफान फटकेबाजी

मुंबई - क्रिकेटचे सामने, क्रिकेटविषयक रंगलेल्या गप्पा अन्‌ जाहिरातींनिमित्तच छोट्या पडद्यावर दिसलेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर ‘चला हवा येऊ द्या’मध्ये मनसोक्त फटकेबाजी करताना दिसणार आहे. ‘सचिन-अ बिलियन ड्रीम्स’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्यक्रमाच्या सेटवर आलेल्या सचिनने क्रिकेटच्या बरोबरीने आपल्या बालपणीच्या काही आठवणी जागवल्या. 

क्रिकेट खेळायला लागल्यापासून विश्‍वचषक जिंकण्याचे स्वप्न मी पाहिले होते. ते पूर्ण व्हायला २२ वर्षांची तपश्‍चर्या करावी लागली. माझ्या हातात विश्‍वचषक आला तो माझ्या आयुष्यातील एक अमूल्य क्षण होता, असे उद्‌गार सचिनने काढले.

 ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या मंचावर क्रिकेट जगताचे दैवत आणि गेल्या दोन पिढ्यांना ज्याने आपल्या बॅटने मंत्रमुग्ध केले तो मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर आला होता. निमित्त होते, त्याच्या आगामी ‘सचिन-अ बिलियन ड्रीम्स’ चित्रपटाचे. या भागात सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबरोबरच आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. सचिनचे मंचावर आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सचिन सचिन  नावाचा एकच जल्लोष झाला. सचिनने अनेक आठवणींना उजाळा दिला. निलेश साबळेच्या सगळ्या प्रश्‍नांवर सचिनने तुफान फटकेबाजी केली आणि अवघा सेट मंत्रमुग्ध झाला. 

गप्पांच्या दरम्यान आपले कुटुंब, गुरू आणि आपल्या सहकाऱ्यांबाबत सचिन भरभरून बोलला. मराठी भाषेवरचे आपले प्रेम आणि मराठी मनोरंजन क्षेत्राबाबतची मतेही त्याने मांडली. साहित्य सहवासातील काही गमतीजमतीही सांगितल्या. सचिनसोबत पत्नी अंजली, भाऊ नितीन तेंडुलकर, अजित तेंडुलकर आणि बहीण सविता तेंडुलकर आवर्जून हजर होते. सचिनच्या भावंडांबरोबरच त्याचे खास मित्र अतुल रानडे, जगदीश व अजित भुरे यांनी त्याच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. 

 ‘झी मराठी’वर २२ आणि २३ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता सचिनवरील विशेष भाग प्रसारित होईल.

चित्रपटातून माझ्या आयुष्याचा उलगडा 
आपला सहकारी हरभजन सिंगचा किस्सा सचिन तेंडुलकरने ऐकवताच सगळीकडे हास्याची लकेर उमटली. तो म्हणाला की, माझ्या चित्रपटात अनेक गोष्टींचा उलगडा होईल. पत्नी अंजली व माझी पहिली भेट लंडन विमानतळावर झाली आणि त्यानंतर आम्ही कसे एकत्र आलो हेही चित्रपटात कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com