'कारशेडबाबत केंद्राच्या भूमिकेत बदल, हा राज्यातील भाजप नेत्यांच्या सांगण्यावरूनच'; सचिन सावंत यांचा घणाघाती आरोप

'कारशेडबाबत केंद्राच्या भूमिकेत बदल, हा राज्यातील भाजप नेत्यांच्या सांगण्यावरूनच'; सचिन सावंत यांचा घणाघाती आरोप

मुंबई ः कांजूरमार्ग मेट्रो कारशेडसंदर्भात राज्यातील भाजप नेत्यांच्या सांगण्यावरूनच केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली आहे. गेले वर्षभर केंद्र सरकार व भाजप विकासकामांमध्ये खोडा घालते आहे, अशी जळजळीत टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. या बदलत्या भूमिकेच्याच अनुषंगाने आजच्या सुनावणीतील केंद्र सरकारची भूमिका पाहिली पाहिजे, असेही सावंत यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्धीस दिलेल्या व्हिडियोमध्ये म्हटले आहे. 

जून महिन्यात खुद्द पियूष गोयल यांनीच कांजूरमार्ग ची जागा राज्य सरकारला द्यावी, विकासकामे थांबू नयेत, त्यांना गती मिळावी असे म्हटले होते. तरीही आता मिठागर विभागाने कांजूरमार्गचे कारशेडचे काम थांबवावे अशी मागणी उच्च न्यायालयात केली. म्हणजे या जागेवर आमचा हक्क आहे हे सांगण्यापेक्षा प्रकल्प थांबवा हे सांगण्याकडे त्यांचे लक्ष आहे. निश्चितपणे राज्यातील भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून केंद्राने आपली भूमिका बदलली आहे. त्यातूनही राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून हे काम होत असल्याची पोटदुखीही यामागे आहे, अशी जोरदार टीका सावंत यांनी केली आहे. 

या जागेवर खासगी मालकाचा हक्क आहे, त्याला चार हजार कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागेल, असे भाजप नेते सांगत होते. जणुकाही त्या खासगी मालकाचे एजंट म्हणूनच भाजप नेते काम करत आहेत, असे चित्र दिसत होते. या खासगी मालकाबद्दल भाजप नेत्यांनाच जास्त पुळका आला होता. पण त्या कथित खासगी मालकाने कधीही सरकारकडे आपला दावा दाखल केला नाही, ही वस्तुस्थिती आहे, असेही सावंत यांनी दाखवून दिले आहे. 

या चार हजार कोटी रुपयांचा खुलासा भाजपला उच्च न्यायालयात कोठेही करता आला नाही. मेट्रो 6 च्या कारशेडचे बांधकाम कांजूरमार्गलाच होणार होते तर मेट्रो 3 ची कारशेड येथे का होऊ शकत नाही, याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे. यासंदर्भात जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचे काम भाजप करीत आहे. आजच्या या निर्णयाला केंद्र सरकारच कारणीभूत आहे, त्यांच्याच दाव्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे.

Sachin Sawants harsh allegations on state bjp leaders on kanjurmarg car shed project in mumbai

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com