साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या जामिनावर युक्तिवाद पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मुंबई - मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाल्याने खंडपीठाने निकाल राखून ठेवला.

मुंबई - मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाल्याने खंडपीठाने निकाल राखून ठेवला.

प्रज्ञासिंह ठाकूरला दोषमुक्त करण्याची शिफारस पुरवणी आरोपपत्राद्वारे आधीच विशेष न्यायालयाकडे केली गेली आहे. त्यामुळे तिला जामीन देण्यासही काही हरकत नाही, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आणि तिला दोषमुक्त करण्याची शिफारस करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उच्च न्यायालयात स्पष्ट केले. बॉंबस्फोटाचा कट रचण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात साध्वी प्रज्ञासिंहचा सहभाग दाखवणारे सबळ पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे तिला दोषमुक्त करण्याची शिफारस "एनआयए'ने पुरवणी आरोपपत्र दाखल करताना विशेष न्यायालयाकडे केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर प्रज्ञासिंहने जामिनाची मागणी केली आहे. तिच्या अर्जावर उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे आणि न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे एनआयएच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. मात्र, बॉंबस्फोटाच्या कटाबाबत झालेल्या काही बैठकांना तिची उपस्थिती असल्याचे तपासात उघड झाले आहे. या बॉंबस्फोटात जीवित आणि वित्तहानी झाल्याने तिला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद पीडितांच्या वकिलांनी केला. या प्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयाने निकाल राखून ठेवला.

Web Title: sadhvi Pragya Singh Thakur's full argument on bail