मॉल नव्हेत, ज्वालामुखी!

मॉल नव्हेत, ज्वालामुखी!

नवी मुंबई - शहरातील बहुसंख्य मॉलमध्ये सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यातच आपत्कालीन स्थितीत उपयुक्त ठरणाऱ्या त्यांच्या तळघरातील जागेचा उपयोग साहित्य ठेवण्यापासून कॅन्टीन, वाहन धुणे आदी बेकायदा कामांसाठी होत असल्याने ‘ज्वालामुखी’ झालेल्या या ठिकाणी हजारो ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. गेल्या आठवड्यात सीवूडस येथील बांधकाम सुरू असलेल्या एका मॉलला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

शहरातील सीवूड्‌स ग्रॅंड सेंट्रल मॉलच्या तळघरात बिनधोकपणे बिग-बझार आणि इतर दुकाने सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी वर्दळ असते. तळघराकडे जाणाऱ्या सरकत्या जिन्यांच्या शेजारच्या मोकळ्या जागेतही दुकाने आहेत. बाजूला कार्यालय आहे. तळघरात एकाच ठिकाणाहून प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग आहे, त्यामुळे आगीची घटना घडल्यास कर्मचाऱ्यांना बाहेर पडणे कठीण होईल. काँग्रेसप्रणीत ‘इंटक’ या संघटनेनेही त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. सीवूड्‌स येथील डी-मार्टच्या इमारतीच्या तळघराचा वापरही पार्किंगऐवजी साहित्य ठेवणे, कार्यालय आदींसाठी सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीत येथील कर्मचाऱ्यांनाही तळघरातून बाहेर पडणे अशक्य आहे. सीवूड्‌स येथील आगीच्या दुर्घटनेनंतर तळघरातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने सर्व व्यापारी संकुलांच्या तळघरांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी इंटकचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्याकडे केली आहे.

मॉलच्या तळघरांचा वापर कशासाठी करावा याकरिता नियमावली आहे. त्याचा भंग केला असेल, तर कारवाई करण्यात येईल. याआधी कोपरखैरणे डी-मार्टवर चुकीच्या वापरामुळे कारवाई केली आहे. सीवूड्‌स येथील डी-मार्टचीही चौकशी करण्यात येईल.
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त

डी-मार्टच्या तळघरातील जागेत वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा आहे. तसेच तळघरात कार्यालये, असून कर्मचारी जेवण करतात. त्यासाठी पालिकेने परवानगी दिली आहे.
- रवींद्र सिंग, डी-मार्ट व्यवस्थापक

तळघरात कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक वापर आम्ही करत नाही. मॉल व्यवस्थापनाची कार्यालये आणि बिग-बझार ही तळघरात नाहीत. तसेच आमच्या कॉर्पोरेट कार्यालयातून आधिक माहिती घेता येईल.
- सुबर्ता बंडोपाध्याय, एलॲण्डटी मॉल, प्रकल्प व्यवस्थापक

तळघरातील वाहने उभी करण्यासाठी दिलेल्या जागेत कॅन्टीन, कार्यालये, वाहने धुणे अशा प्रकारचा वापर सुरू असताना आग लागल्यास आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी येतात.  त्यामुळे तळघरातील जागा केव्हाही मोकळ्या असाव्यात. 
- जे. टी. पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com