esakal | सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे

कोव्हिडमुळे वैद्यकीय क्षेत्राचे महत्व अधोरेखित झाले आहे. येत्या काळात आरोग्यदायी महाराष्ट्राचे व्हिजन घेऊन काम करू, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 'सकाळ सन्मान सोहळ्यात' जाहीर केले. 

सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई  - गेली वर्षभर कोरोनाच्या संकटात स्वतःचा जीव धोक्‍यात घालून कठोर परिश्रम करून जनतेला सुरक्षित ठेवणाऱ्या सर्वसामान्य शवागार कर्मचाऱ्यापासून ते वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्राचे गृहमंत्री, आरोग्यमंत्री या अशा 31 सेवाव्रतींचा गौरव "सकाळ सन्मान-2021' या बहारदार कार्यक्रमात झाला.

मुंबईतील प्रभादेवीच्या रवीद्र नाट्यमंदिरात शनिवारी (ता. 30) झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या सर्वांनीच या व पडद्यामागे काम करणाऱ्या अशाच असंख्य अनामवीर कोरोनायोद्‌ध्यांच्या परिश्रमांचा मुक्तकंठाने गौरव केला. तसेच या कोरोनायोद्‌ध्यांच्या सन्मानाच्या माध्यमातून असंख्य लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या "सकाळ'च्या या प्रयत्नाचेही कौतुक केले. 

खरे पाहता या समारंभात हजर असलेलेच फक्त कोरोना योद्धा आहेत असे नाही, अशीच सर्वांची मनोमन भावना होती. असे शेकडो लोक या पुरस्काराला पात्र आहेत. महाराष्ट्र कोरोनाच्या सावटातून बाहेर यावा यासाठी कित्येक लोकांनी कसलीही अपेक्षा न ठेवता प्रयत्न केले. त्या सर्वच कोरोनायोद्‌ध्यांचे आभार मानण्याचा, त्यांचे ऋण फेडण्याचा हा लहानसा प्रातिनिधिक प्रयत्न आहे, याचीही जाणीव सर्वांनाच होती. किंबहुना मान्यवर वक्‍त्यांनीही तसेच बोलून दाखवले. अर्थात आपल्याला हा पुरस्कार मिळाला नाही, याची खंत न बाळगता सर्वच उपस्थितांनी विजेत्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले. 

सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

"माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेमुळे राज्याची आरोग्य व्यवस्था प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचली आहे. राज्यातील प्रत्येक दीर्घकालीन आजाराच्या रुग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेने मिळवली आहे, असे नमूद करत कोव्हिडमुळे वैद्यकीय क्षेत्राचे महत्व अधोरेखित झाले आहे. येत्या काळात आरोग्यदायी महाराष्ट्राचे व्हिजन घेऊन काम करू, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. 

"सकाळ' मुंबई आवृत्तीच्या 50 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने "कोव्हिड योद्धा' म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरोग्यमंत्र्यांना "सकाळ सन्मान पुरस्काराने' गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने सत्काराला उत्तर देताना टोपे यांनी आरोग्यदायी महाराष्ट्राचे व्हिजन घेऊन काम करणार असल्याचे जाहीर केले. "हा पुरस्कार प्रत्येक कोव्हिड योद्‌ध्यांचा, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कोव्हिड विरोधातील लढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचा गौरव असून यातून सर्वांचीच जबाबदारी अधिक वाढली असल्याचे त्यांनी नमुद केले. आरोग्याकडे आपण सर्वच दुर्लक्ष करायचो, सरकार दुर्लक्ष करायचे, अशी प्रांजळ कबुलीही टोपे यांनी दिली. नियोजन आयोगाच्या शिफारशीनुसार अर्थसंकल्पांचा सहा टक्के हिस्सा आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रासाठी राखीव असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात जास्तीत जास्त एक टक्का हिस्सा राखीव ठेवला जातो. पण आता ही परिस्थिती बदलायला हवी, असेही त्यांनी नमुद केले. 

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Sakal sanman sohala Healthy Maharashtra is our vision Health Minister Rajesh Tope