1 मे 2022 पर्यंत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला, MSRDC चे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांची माहिती

1 मे 2022 पर्यंत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला, MSRDC चे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांची माहिती

मुंबई, 8 : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू असून 1 मे 2022 पर्यंत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सांगितले. आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या बांधकामाची सद्यःस्थिती दर्शवणारी ध्वनीचित्रफीत सादर करून माहिती दिली.

समृद्धी महामार्गाचे बांधकाम वेगात सुरू आहे. 701 किमी लांबीपैकी आतापर्यंत 152.17 किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून शिर्डीपर्यंतचा 520 किमी लांबीचा पट्टा 1 मे 2021 पर्यंत तर 623 किमी लांबीचा मार्ग 1 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण केला जाईल. तर संपूर्ण समृद्धी महामार्ग 1 मे 2022 पर्यंत वाहतुकीसाठी खुला असेल.

दरम्यान, समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या नवनगरांबाबतची माहितीही मोपलवार यांनी दिली. समृद्धी महामार्गालगत 19 नवनगरांची उभारणी केली जाणार असून 8 नवनगरांचा विकास आराखडा तयार असून, 8 पैकी 6 नवनगरांसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पुढील वर्षीच्या जूनपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नवनगरांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार असून एक लाख लोकसंख्या सामावू शकेल, अशा प्रकारची नवनगरांची रचना असेल, असे ही मोपलवार यांनी सांगितले. 

20 हजार कामगारांची उपस्थिती

कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीपूर्व काळात समृद्धी महामार्गाच्या बांधकामात 18 हजार कामगार काम करत होते. टाळेबंदीनंतर अनेक जण गावी गेल्याने या कालावधीत समृद्धी महामार्ग बांधकामाचा वेग थोडा मंदावला होता. परंतु आता गेल्या दोन महिन्यांपासून कामगार पुन्हा कामावर परतू लागले असून 20 हजारांहून अधिक कामगार या प्रकल्पात काम करत असल्याचे मोपलवार यांनी सांगितले. 

विजेवरील वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा

समृद्धी महामार्गावर दर सुमारे 50 किमी मार्गावर दोन्ही बाजूला वेसाइड ऍमेनिटीजची उभारणी करण्यात येणार असून भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रत्येक ठिकाणी विजेवर चालणा-या वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याबरोबरच महामार्गावर इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) ही सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून वाहनांचा वेग, लेन कटिंग, वाहन ब्रेकडाऊन होणे इत्यादींवर लक्ष ठेवले जाणार आहे. 

40 हजार कोटी रुपये अभियांत्रिकी खर्च

समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकूण 55 हजार 331 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी 40 हजार कोटी रुपये अभियांत्रिकी कामांवर खर्च होणार आहे. महामार्गावर 8 बोगदे, व्हायाडक्ट्स, रेल्वेमार्गावरील पूल, नदीवरील पूल इत्यादी संरचनांचा समावेश असेल. वन्यप्राण्यांच्या संचारावर गदा येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी अंडरपास आणि ओव्हरपास बांधण्यात येणार असल्याचेही मोपलवार यांनी यावेळी सांगितले.

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाविषयी

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 701 किमी लांबीचा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग आहे. दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना हा महामार्ग जोडत जाणार आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर 8 तासांत पूर्ण करता येणार आहे. महामार्गावर 19 ठिकाणी नवनगरांची (कृषी समृद्धी केंद्रे) उभारणी केली जाणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

samruddhi mahamarga will be open for use by 1st may 2022 says radheshyam mopalwar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com