'आता राऊतांना समजले असेल, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे न जाता राज्यपालांकडे का गेले - संदीप देशपांडे

तुषार सोनवणे
Wednesday, 18 November 2020

महावितरणाच्या परिपत्रकानंतर वीज ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

मुंबई - कोरोना काळात ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत सवलत देण्यास महावितरणाने नकार दिला आहे. ग्राहकांना दिलासा दिला जाईल या भूमिकेपासून नितीन राऊतांनी यू टर्न घेतला आहे. वीज कंपन्या वाढीव बिले देणार आणि सरकार त्याचे पैसे भरणार हे कसे चालेल असा सवाल उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्याने उपस्थित करीत सवलतीची मागणी फेटाळून लावली आहे. महावितरणाच्या परिपत्रकानंतर वीज ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

हेही वाचा - 'महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले, वर्षभरापूर्वीचे दुःख विसरायला ते तयार नाही' - संजय राऊत

संदिप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता 'कृष्णकुंज' असे म्हटले होते. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली होती. वीजबिल सवलत नाकारल्या नंतर संजय राऊत यांना देशपांडे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणतात की.''आता संजय राऊत यांना समजलं असेल की राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न जाता राज्यपालांकडे का गेले. हे सरकार काहीच करणार नाही याची आम्हाला पहिल्यापासून खात्री होती आणि आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. जनता जोवर रस्त्यावर उतरणार नाही तोवर सरकारचं डोकं ठिकाणावर येणार नाही,” एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना देशपांडे यांनी ही प्रतिक्रीया दिली.

हेही वाचा - पालघर साधू हत्येप्रकरणी भाजप आक्रमक; प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी

“वाढीव वीजबिलं दिलेली आहे. अशी अनेक कार्यालयं आहेत जी सहा सहा महिने बंदी होती त्यांनाही मोठी बिलं आली आहेत. याचं सरकार उत्तर द्यायला तयार नाही. युनिटचा दरही सरकारनं कंपन्यांना वाढवून दिला आहे,” असेही देशपांडे यावेळी म्हणाले. तसेच लॉकडाउनच्या कालावधीत लोकांकडे कामधंदे नाहीत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे, कर्जाचे हप्ते आहेत अशा परिस्थितीत लोकांना दिलासा देण्याऐवजी लोकांच्या खिशात हात घालण्याचं काम सरकार करत आहे. याबद्दल प्रचंड राग आणि संताप लोकांच्या मनात असल्याची टीकाही देशपांडे यांनी केली. 

Sandeep Deshpande criticizes Thackeray government for denying electricity bill concessions

------------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandeep Deshpande criticizes Thackeray government for denying electricity bill concessions