नाईकांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला अच्छे दिन

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

येत्या काळात संपूर्ण नाईक कुटुंबिय भाजपात दाखल होणार असल्याने आता काँग्रेसला ऐरोली व बेलापूर या दोन्ही विधानसभांपैकी एकावर दावा करण्याची आयतीच संधी चालून आली आहे. मागील अनेक वर्षे नाईकांसोबत कॉंग्रेस नेत्यांचे विळाभोपळ्याचे नाते असतानाही पक्षाआदेश म्हणून निवडणूकीत नाईकांना मदत केलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांना विधानसभेची निवडणूक लढता येणार आहे. 

नवी मुंबई : आमदार संदीप नाईक यांच्या प्रवेशानंतर माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासह इतर नाईक कुटुंबिय भाजपच्या वाटेवर असल्यामुळे राष्ट्रवादीला अखेरची घरघर लागली आहे.

येत्या काळात संपूर्ण नाईक कुटुंबिय भाजपात दाखल होणार असल्याने आता काँग्रेसला ऐरोली व बेलापूर या दोन्ही विधानसभांपैकी एकावर दावा करण्याची आयतीच संधी चालून आली आहे. मागील अनेक वर्षे नाईकांसोबत कॉंग्रेस नेत्यांचे विळाभोपळ्याचे नाते असतानाही पक्षाआदेश म्हणून निवडणूकीत नाईकांना मदत केलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांना विधानसभेची निवडणूक लढता येणार आहे. 

1999ला कॉंग्रेसचे विभाजन झाल्यावर नवी मुंबईतील अनेक कॉंग्रेसचे मात्तबर नेते राष्ट्रवादीत गेले होते. त्यावेळेला झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत गणेश नाईक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढले होते. परंतु, शिवसेनेच्या सीताराम भोईरांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. यादरम्यान शहरातही कॉंग्रेसचे नेते संतोष शेट्टी, अनिल कौशिक, डॉ.जयाजी नाथ, वृषाली सरोदे, दिपक पाटील यांनी कॉंग्रेसचा अखेरपर्यंत किल्ला लढवला होता. तेव्हा पासून आजपर्यंत कॉंग्रेसच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांचे नाईक आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत केव्हाच पटले नाही. राज्यात आघाडी असताना नवी मुंबईत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कधीच एकत्र झाले नव्हते. प्रत्येक विधानसभा निवडणूकीत बेलापूर व ऐरोली या दोन्ही जागा पक्षश्रेष्टींनी राष्ट्रवादीला देऊन टाकल्या होत्या. मात्र नवी मुंबईतील स्थानिक नेत्यांची दोघांपैकी एका जागेवरील दावा कधीच सोडला नाही.

विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसमध्ये असताना नामदेव भगत यांनी बंडखोरी करून बेलापूर विधानसभेत नाईकांना अव्हान दिले होते. परंतू नाईकांच्या झंजावाता पूढे ते टीकाव धरू शकले नाही. त्यानंतर 2014 ला राज्यभरात कॉंग्रेस व राष्ट्रवादी वेग-वेगळी लढल्याने भगत यांना पुन्हा पक्षातर्फे बेलापूरमधून गणेश नाईकांविरोधात तर रमाकांत म्हात्रे यांना ऐरोली मतदार संघातून संदीप नाईकांविरोधात उभे राहावे लागले होते. मात्र मोदी लाटेमुळे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता नाईक कुटुंबियच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीला ऐरोली व बेलापूर मतदार संघात पुन्हा उमेदवार शोधावा लागणार आहे.

राष्ट्रवादीकडे उमेदवार अभावी रिकाम्या झालेल्या विधानसभांच्या जागांवर कॉंग्रेसच्या राज्यातील नेत्यांकडून दावा केला जाऊ शकतो. नवी मुंबईतील स्थानिक नेत्यांनी त्यादिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. बेलापूर विधानसभेसाठी कॉंग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, प्रदेश सचिव संतोष शेट्टी, माजी नगरसेवक दशरथ भगत यांच्या नावाची चर्चा आहे. तर ऐरोली मतदार संघात पुन्हा एकदा रमाकांत म्हात्रे, दिपक पाटील यांना पक्षातर्फे उमेदवारी दिली जाऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandip Naik s entry in BJP is beneficial to Congress