अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस 

नेत्वा धुरी
शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील "लॉगहट' या विश्रामगृहात दारू पार्टी रंगल्याची बातमी "सकाळ'ने प्रसिद्ध केल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. त्यांनी मुख्य वनसंरक्षक आणि नॅशनल पार्कचे संचालक अन्वर अहमद यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील "लॉगहट' या विश्रामगृहात दारू पार्टी रंगल्याची बातमी "सकाळ'ने प्रसिद्ध केल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. त्यांनी मुख्य वनसंरक्षक आणि नॅशनल पार्कचे संचालक अन्वर अहमद यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील तुळशी तलावाजवळील विश्रामगृहात उद्यानाचे संचालक अहमद यांच्यासह काही आजी-माजी अधिकाऱ्यांची दारू पार्टी रंगल्याची बातमी "सकाळ'ने प्रसिद्ध केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर सर्वच स्तरांतून टीका होऊ लागली. याची गंभीर दखल घेत वनमंत्री मुनगंटीवार यांनी अहमद यांना जाब विचारला. मात्र, छायाचित्रात दिसत असलेल्या ग्लासमध्ये दारू नसून "ऍप्पी' हे शीतपेय असल्याचा दावा अन्वर यांनी केला. मात्र, दारूने भरलेल्या ग्लासासह छायाचित्रात "चकणा'ही दिसत असल्याने वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून लेखी खुलासा करावा, असे आदेशही दिले. तसेच यापुढे विश्रामगृहात पाण्याव्यतिरिक्त कोणतेही पेय नेण्यास वनमंत्र्यांनी मनाई केली आहे. 

"सकाळ'च्या बातमीची मंत्रालयात चर्चा 
मंत्रालयात मंगळवारी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला जातो. मात्र, वन अधिकाऱ्यांच्या दारू पार्टीबाबत "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीवरच या बैठकीत जोरदार चर्चा रंगली होती. या दारू पार्टीवरच वरिष्ठ अधिकारी बराच वेळ चर्चा करीत होते. 

कारणे दाखवा नोटीसवर अधिकाऱ्यांना आठवडाभरात उत्तर द्यावे लागणार आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अशी चूक होणार नाही, असे शपथपत्र वन अधिकाऱ्यांकडून लिहून घेण्यात येणार आहे. 
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री.

Web Title: Sanjay Gandhi National Park in Borivli wine party issue