मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक- संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देण्यात आली आहे. ते पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी असल्यामुळे त्यांना खलिस्तानी म्हटले जात आहे. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. 

मुंबई- कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी पंजाब आणि हरियाणा येथून हजारो शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत. या शेतकऱ्यांवर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी बळाचा वापर केला. यामुळे केंद्र सरकारवर मोठ्याप्रमाणात टीका होत असतानाच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तानी कनेक्शन असल्याचा दावा केला होता. त्याचा समाचार शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी घेतला आहे.  दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर फक्त गोळ्या घालायचे बाकी राहिले आहे. पंजाबमधन आलेल्या शेतकऱ्यांना जर तुम्ही खलिस्तानी म्हणत असाल किंवा त्या वेळची आठवण करुन देत असाल याचा अर्थ तुम्हाला पुन्हा अस्वस्थता निर्माण करायची आहे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

मुख्यमंत्री खट्टर यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, आमच्याकडे इनपुट आहेत की काही समाजकंटक या गर्दीमध्ये घुसले आहेत. आताच याचा खुलासा करणं योग्य नाही. त्यांनी थेट घोषणाबाजी केली आहे. जे ऑडिओ आणि व्हिडिओ समोर आले आहेत त्यामध्ये इंदिरा गांधी यांच्याबाबत स्पष्ट घोषणा देताना दिसत आहे. ते म्हणत आहेत की, जर इंदिरा गांधींसोबत करू शकलो तर मोदींबाबत काय अवघड आहे.

हेही वाचा- तुमचं नाव बदलेल पण हैदराबादचं नाही, ओवेसींचा योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवार

यावर संजय राऊत म्हणाले की, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिल्लीत अडवले, त्यावरुन ते या देशाचे नागरिक नाहीत असे दिसून आले. त्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देण्यात आली आहे. ते पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी असल्यामुळे त्यांना खलिस्तानी म्हटले जात आहे. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. 

हेही वाचा- 'इंदिरांना मारलं तर मोदी काय चीज?', शेतकरी आंदोलनात खलिस्तानींच्या घोषणेचा खट्टर यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, मी रोज शरद पवारांना भेटतो. माझे त्यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्यांना लपून-छपून भेटण्याची आपल्याला गरज नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut slams on modi government for treating farmer of punjab haryana as a terrorist