कोणाच्या जाण्याने फरक पडत नाही; संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

कोणाच्या जाण्याने फरक पडत नाही; संजय राऊत

मुंबई : ‘‘कोणाच्या सोडून जाण्याने फरक पडत नाही. पण जे गेले, त्यातील कितीजण निवडून येतात ते बघूच, असे आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना पुन्हा एकदा दिले. खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) साथ सोडल्याने लोक उद्या त्यांना विसरून जातील, अशा शब्दांत राऊत यांनी कीर्तिकर यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेने कीर्तिकर यांना काय कमी केले, असा सवाल करीत त्यांचे पुत्र अमोल आमच्याकडे आहेत, हेही राऊत यांनी अधोरेखित केले.

खासदार कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेते (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर आगपाखड केली. कीर्तिकर यांच्या जाण्याने काडीचाही फरक पडणार नसल्याचे सांगून संजय राऊत यांनी बंडखोर आमदार खासदारांनाच इशारा दिला. ते म्हणाले, ‘‘शिवसेनेत कीर्तिकर हे चार वेळा आमदार, मंत्री, दोनदा खासदार राहिले. तरीही या वयात ते सोडून जातात तेव्हा निष्ठेबाबत शंका उपस्थितीत होते. मात्र, कीर्तिकर आता जे काही बोलत आहेत त्याला फारसा अर्थ नाही. ’’

‘ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार’

गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे यांची साथ सोडल्यानंतरही त्यांचे पुत्र शिवसेनेचे उपनेते अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेत वडिलांनी प्रवेश केल्यानंतर आज अमोल कीर्तिकर यांनी शिवसेनेच्या बैठकांना हजेरी लावली. आपण कायमच ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले.

कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्यांचा निषेध केला. अंधेरी परिसरात उभारलेले कीर्तिकर यांचे फलकही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काढले.

हिमाचलमध्ये प्रियांका गांधींची मेहनत

‘‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भेटीमुळे देश आणि लोकशाही वाचविण्याचा संदेश मिळाला आहे. हिमाचल प्रदेशातील निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी मेहनत घेतली असून, त्याचा परिणाम निकालातून दिसून येईल,’’ असेही राऊत यांनी सांगितले.