संजय राऊतांच्या खंद्या समर्थकांची डोंबिवलीत बॅनरबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Banners

डोंबिवलीतील ठाकरे गटाचे व संजय राऊत यांचे खंदे समर्थक नाशिकचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी बॅनरबाजी करत मशाल चिन्हाचा मथितार्थ सांगू केला आहे.

संजय राऊतांच्या खंद्या समर्थकांची डोंबिवलीत बॅनरबाजी

डोंबिवली - डोंबिवलीतील ठाकरे गटाचे व संजय राऊत यांचे खंदे समर्थक नाशिकचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी बॅनरबाजी करत मशाल चिन्हाचा मथितार्थ सांगू केला आहे. 1985 साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरविले त्यावेळी त्यांची निशाणी मशाल होती याच आठवणींना पुन्हा उजाळा देत "ललकार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि निष्ठावंताची" असा संदेश दिला आहे. निष्ठावंतांची या शब्दाचा उल्लेख करत चौधरी यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. पक्षाची नाशिकची जबाबदारी खांद्यावर समर्थपणे पेलल्यानंतर आता भाऊ डोंबिवलीत पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचे यावरून दिसून येते.

शिवसेनेचे नेते व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असा दावा केला. त्यानंतर शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे व शिंदे समर्थक आपापसात भिडले. कल्याण डोंबिवली मध्ये देखील शिंदे गटाला ठाकरे गटातील मोजक्या शिवसैनिकानी टक्कर दिल्याचे आपण पाहिले. त्यानंतर मात्र डोंबिवलीतील ठाकरे गट काहीसा थंडावला असल्याचे पहायला मिळत आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन, मोर्चे करणारी शिवसेना दिसत नाही याची चर्चा कल्याण डोंबिवली मध्ये प्रकर्षाने सुरू आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मशाल व शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह मिळाले. यानंतर डोंबिवली शिंदे गटाने जल्लोष केला, मात्र ठाकरे गटाकडून काहीही फारशी हालचाल झालेली दिसली नाही. हे पाहता डोंबिवलीकर व शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी हे डोंबिवलीत सक्रिय होत असल्याचे पहायला मिळत आहे. भाऊ चौधरी यांनी लावलेले बॅनर शहरात चर्चेचा विषय बनले आहेत.

मशाल चिन्ह पक्षाला मिळाले असून या शब्दाची नेमकी उकल करत त्यामागचा मथितार्थ त्यांनी बॅनर वर मांडला आहे.

म... महाराष्ट्राच्या अस्मितेची

शा..... शान हिंदुत्वाची

ल... ललकार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि निष्ठावंताची.

अशी उकल करत त्यांनी एक प्रकारे विरोधी शिंदे गटाला देखील यातून टोला लगावला आहे.

भाऊ चौधरी हे शिवसेनेतील संजय राऊत यांचे खंदे समर्थक आहेत. शिवसेना कार्यकर्ता, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, शहरप्रमुख, परिवहन सभापती आशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांचा ओढा नाशिककडे जास्त होता. आता डोंबिवलीतील पक्षातील कार्यकर्त्याना सक्रिय करणे, त्यांचे नेतृत्व करणे यांसारखी जबाबदारी ते पेलताना दिसत आहेत.

मशाल चिन्हांविषयी ते म्हणाले, पक्षाला मशाल चिन्ह मिळाले आहे. शिवसेनेकडे या आधीही मशाल चिन्ह होते. छगन भुजबळ नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले होते. 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि भुजबळ सेनेचे एकमेव आमदार झाले. 1985 साली दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि मशाल या चिन्हावर सेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि महापालिकेत सेनेची सत्ता आली. भाऊसाहेबांनी त्यावेळी भगवा हाती घेत पक्षाचा मशाल चिन्हाचा प्रचार केला होता याची आठवण त्यांनी यावेळी केली.

डोंबिवलीत पुन्हा सक्रिय झाल्याविषयी भाऊ म्हणाले, नाशिकची जबाबदारी असल्याने मी जास्तीत जास्त नाशिकला असतो. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा या ठिकाणी शिवसेना वाढीसाठी काम करतो आणि पक्षासाठी जे काही योगदान द्यायचे असेल ते देतो. पक्ष वाढीसाठी ज्या ठिकाणी फिरण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी मी नक्कीच फिरणार आहे असे ते म्हणाले.