संतोष बांगर शक्तीप्रदर्शन: सह्याद्री अतिथीगृहात नियम धाब्यावर, कार्यकर्ते ओक्केमध्ये!

Santosh Bangar
Santosh BangarSakal Digital

मुंबई : सह्याद्री अतिथीगृह हे मंत्रिमंडळ बैठका, महत्वाच्या प्रशासकीय बैठकासाठी ओळखल जाते. येथे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री राहतात. मात्र राज्यातील सत्तांतरणानंतर हे अतिथिगृह राजकीय शक्तीप्रदर्शनाचे केंद्र बनले की काय असे चित्र उभे झाले आहे. हिंगोलीचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर हे मंगळवारी (ता. १२) आपल्या शेकडो कार्यकर्ते घेऊन इथे आले. यानंतर अतिथीगृहाचे नियम धाब्यावर बसवून या कार्यकर्त्यांसाठी नाष्ट्याची सोयही करण्यात आली. या सर्वांसाठी राजशिष्टाचार विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे आता स्पष्ट झाले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीच राजशिष्टाचार मोडल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार बांगर सहभागी झाले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून त्यांना हटवल्याने ते शक्तीप्रदर्शनासाठी शेकडो कार्यकर्त्यांनासह थेट सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सह्याद्रीवर होते. राजशिष्टाचाराच्या नियमानुसार आमदार किंवा खासदारांना सह्याद्री अतिथीगृह मिळत नसते, मात्र सर्व नियम पायदळी तुडवत शेकडो बांगर समर्थकांना सह्याद्री अतिथीगृहात सामावून घेतले गेले.

बांगर यांच्या कार्यकर्त्यांमुळे सह्याद्री अतिथीगृहाला जिल्हा पातळीवरी रेस्ट हाऊसचे स्वरूप आले होते. सह्याद्री अतिथीगृहाच्या अधिकाऱ्यांनी आणि राजशिष्टाचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेनंतर हात वर केले असून, असा प्रकार यापूर्वी कधीही न झाल्याचे सांगितले. बांगर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अशा कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नव्हती. बाहेरून खानपान व्यवस्था बोलावण्याचा कुठलाही नियम नाही. त्यामुळे एका आमदारासाठी एवढी बडदास्त ठेवल्याचे चित्र होते. राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना या घटनेबद्दल विचारले असता त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याकडून व्यवस्था
बांगर यांच्या कार्यकर्त्यांसाठी अधिकृतपणे सोय करता येत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) शाखा अभियंत्यांकडून खासगी व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. कार्यकर्त्यांसाठी बाहेरून खुर्च्या, वडापाव, आइस्क्रीम, चहा पाण्याची सोय करण्यात आली होती. काही कार्यकर्त्यांनी चक्क खाली बसून आरामात नाष्ट्यावर ताव मारल्याचे व्हिडीओ व्हायरल झाला.

राज्य अतिथी दर्जा आवश्यक
इतर राज्यातील राजकीय, सामाजिक किंवा प्रशासकीय अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांना सह्याद्री अतिथी गृहात प्रवेश देता येतो. मात्र, त्यासाठीही मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने संबधित पाहुण्यांना राज्य अतिथींचा दर्जा देणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणालाही सह्याद्री अतिथीगृहात थांबता येत नाही.

राज्यात यांनाच अतिथी गृहात प्रवेश
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सह्याद्री अतिथी गृहात प्रवेश आहे. त्याशिवाय कॅबिनेट मंत्री आणि राज्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जर प्रशासकीय बैठका असतील तर त्यांना अतिथी गृहात प्रवेश आहे. संबधित मंत्र्यांकडून नाव आल्यास त्यांना प्रवेश मिळतो. आमदारांना बैठकीत आमंत्रित केल्याशिवाय थेट प्रवेश नसतो. शासकीय कामकाजासाठी अतिथीगृहातील हॉल बूक करता येते.

माझ्या स्वीय सहायकाने सह्याद्री अतिथी गृहात जाण्यासाठी रितसर परवानगी घेतली होती. तर अतिथीगृह व्यवस्थापनाकडून नाश्ता आणि चहा पाण्याची व्यवस्था केली होती. माझ्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भातील संपूर्ण बिल अदा केले आहे.
- संतोष बांगर, आमदार, हिंगोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com