सफाळे रेल्वे स्थानकावरील फाटक दुरूस्तीसाठी वारंवार बंद; नागरिक त्रस्त 

प्रमोद पाटील
शुक्रवार, 30 मार्च 2018

"रेल्वे फाटकाच्या येथील अर्धवट असलेल्या तसेच इतर कामासाठी फाटक चार दिवस बंद करण्यात आले आहे."
- चुनिलाल अगिवाल , स्टेशन मास्टर (सफाळे रेल्वे स्थानक)

सफाळे : पालघर जिल्हयातील पश्चिम रेल्वेवर असलेल्या सफाळे रेल्वे स्थानकावरील फाटक गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार बंद केले जात असल्याने परिसरातील जनतेने तीव्र संताप व्यक्त केला असून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी. तसेच आमचा हा वनवास कधी संपेल? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.

गेल्या 5 ते 9 ऑक्टोबर नंतर पुन्हा 4 ते 10 डिसेंबर असे सात दिवस पेवर ब्लॉक आणि इतर कामासाठी बंद करण्यात आले होते. आता पुन्हा 27 ते 30 मार्च असे चार दिवस दुरूस्तीसाठी रेल्वे फाटक बंद करण्यात आले असल्याने परिसरातील जनतेची गैरसोय झाली आहे. या पूर्वी रुळाच्या  केलेल्या कामामुळे रुळावरून गाडी जात असताना मोठ्या प्रमाणात हादरा बसतो. तसेच फाटका जवळील इतर कामासाठी फाटक बंद करण्यात आले आहे असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर सदर ठेकेदाराच्या कामा बाबतीत संताप व्यक्त केला जात आहे.

सफाळे ही पश्चिमेकडील पन्नास गावांची मुख्य बाजारपेठ असून या बाजारपेठेसह  दवाखाने, बॅंक, शाळा, पोस्ट ऑफिस आदी सर्व अत्यावश्यक सेवा रेल्वे फाटकाच्या पूर्वेला असल्याने फाटक बंद असल्याने पूर्वेला जाण्यासाठी दूरवर चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कपासे येथील उड्डाण पुलावरून जावे लागते. वारंवार फाटक बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. एकदाचे काम पूर्ण करून फाटक खुले करा अशी मागणी येथील लोक करत आहेत.

"रेल्वे फाटकाच्या येथील अर्धवट असलेल्या तसेच इतर कामासाठी फाटक चार दिवस बंद करण्यात आले आहे."
- चुनिलाल अगिवाल , स्टेशन मास्टर (सफाळे रेल्वे स्थानक)

"सतत फाटक बंद असल्याने आम्हाला खुपच त्रास होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वे फाटका जवळ उड्डाण पुलाची आमची मागणी शासन दरबारी धुळ खात पडुन आहे.  उड्डाण पुलाची खरी गरज आहे "
- धनेश गावड,  प्रवासी टेंभीखोडावे 

 

Web Title: saphale railway crossing maintenance work inconvenient for people