चावडीत राष्ट्रवादीच! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

सातारा - ग्रामपंचायतींच्या अटीतटीच्या निवडणुकांमध्ये आज 256 पैकी सुमारे 118 ग्रामपंचायतींचे कारभारपण मिळवत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा जिल्ह्याचा गड राखला. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी सुमारे 16 सरपंच निवडून आणत त्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात प्रवेश केला. कॉंग्रेसला 50 ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखता आले. तीन ठिकाणी भाजपशी, तर दोन ठिकाणी शिवसेनेशी युती करून कॉंग्रेसने सत्ता मिळवली.

सातारा - ग्रामपंचायतींच्या अटीतटीच्या निवडणुकांमध्ये आज 256 पैकी सुमारे 118 ग्रामपंचायतींचे कारभारपण मिळवत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा जिल्ह्याचा गड राखला. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी सुमारे 16 सरपंच निवडून आणत त्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात प्रवेश केला. कॉंग्रेसला 50 ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखता आले. तीन ठिकाणी भाजपशी, तर दोन ठिकाणी शिवसेनेशी युती करून कॉंग्रेसने सत्ता मिळवली.

आमदार शंभूराज देसाई यांच्या गटाच्या जागांमुळे शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त 32 सरपंचांचा आकडा आपल्या नावावर करता आला. 21 ठिकाणी पक्षविरहित स्थानिक आघाड्यांचे सरपंच निवडून आले. निकालाचे आजचे चित्र असे असले, तरी स्थानिक आघाड्यांच्या सरपंचांमुळे संख्याबळाबाबत पक्षीय दावे-प्रतिदावे आगामी काळात केले जाण्याची शक्‍यता आहे. 

मलवडीत गोरे बंधूंना धक्का 
माण तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणूक अनपेक्षित निकालांनी गाजली. बहुचर्चित आंधळी कॉंग्रेसने ताब्यात घेतली, महिमानगडचा गड राष्ट्रवादीने राखला. वरकुटे- मलवडीवर भाजपने झेंडा फडकविला, तर मलवडीत दोन्ही गोरेंना धक्का देत अपक्षाने बाजी मारली. 

बावीसपैकी दहा ग्रामपंचायती कॉंग्रेसकडे, सहा राष्ट्रवादीकडे, एक भाजपकडे, तीन अपक्ष, तर दोन संमिश्र अशी सध्या स्थिती आहे. 

खंडाळ्यात दोन्ही सरपंच भापजचे 
संवेदनशील असणाऱ्या दोन्ही ग्रामपंचायतीचे सत्ता परिवर्तनाचे धक्कादायक निकाल आज जाहीर झाले. यात शिरवळ ग्रामपंचायतीमध्ये "गड आला; पण सिंह गेला,' अशीच परिस्थिती झाली. शहर परिवर्तन विकास महाआघाडी व भाजपच्या लक्ष्मी सागर पानसरे या सरपंचपदी निवडून आल्या. आसवली येथेही सलग 15 वर्षे सत्तेवर असणाऱ्या जन्नीदेवी विकास पॅनेलच्या दत्ता ढमाळ यांना धूळ चारत सोनबाबापू विकास आघाडीच्या मनीषा दीपक ढमाळ सरपंचपदी निवडून आल्या. 

जावळीत राष्ट्रवादीच 
जावळी तालुक्‍यात दहापैकी नऊ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा करिष्मा कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. भाजपचा पूर्णपणे धुव्वा झाला. शिवसेनेला एका सरपंचपदावर समाधान मानावे लागले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळीवरील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. 

मायणीत सचिन गुदगे सरपंच 
खटाव तालुक्‍याचे संपूर्ण लक्ष लागलेल्या मायणी ग्रामपंचायतीवर माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सरपंचपदासह दहा जागा जिंकत 55 वर्षांनंतर ऐतिहासिक सत्तांतर घडविले. सुरेंद्र गुदगे यांच्या पॅनेलला सात जागांवर समाधान मानावे लागले. त्यांचे बंधू सचिन गुदगे येळगावकर गटाच्या पॅनेलमधून सरपंच झाले. ललगुण ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी घाडगे व भाजपचे हणमंतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता कायम ठेवली. 

फलटणमध्ये राजे गट वरचढ 
फलटण तालुक्‍यातील 24 ग्रामपंचायतींपैकी 16 ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी, दोन ग्रामपंचायती राष्ट्रवादी, भाजप व मित्र पक्षाचे, तर सहा ग्रामपंचायतींत कॉंग्रेसला सरपंचपद मिळाले. गिरवी व आदर्की खुर्दचे सरपंचपद राष्ट्रवादी व मित्रपक्षाकडे गेले आहे. गिरवी जिल्हा परिषद गट व गण कॉंग्रेसकडे असूनही ग्रामपंचायत कॉंग्रेसला राखता आली नाही. दुधेबाबी, चव्हाणवाडी व ताथवडा ग्रामपंचायती सत्तांतर होऊन कॉंग्रेसकडे गेल्या, तर वडले, कुसूर, गिरवी व कुरवली खुर्द ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे आल्या. 

वाईत कॉंग्रेसची बेरीज 
वाई तालुक्‍यात सात ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. भुईंजमध्ये कॉंग्रेसने तर बोपर्डी व गोवेदिगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता कायम राखली. किकली, काळंगवाडी, कवठे, पांडे या चार ग्रामपंचायतींत परिवर्तन झाले. किकलीत कॉंग्रेसच्या मदतीने कमळ फुलल्याने प्रथमच भाजपचा झेंडा फडकला. कवठेत कॉंग्रेसने, तर पांडे व काळंगवाडीत शिवसेना व अन्य पक्षाच्या मदतीने कॉंग्रेसने सत्ता काबीज केली. 

पाटणकरांची आघाडी 
पाटण तालुक्‍यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 25 ग्रामपंचायतींत सत्तांतरचा जनतेने कौल दिला. गारवडे, नाटोशी, रासाटी व ढेबेवाडीचे सत्तांतर पाटण तालुक्‍यात चर्चेचा विषय आहे. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकरांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला 37 जागांवर वर्चस्व मिळवले. आमदार शंभूराज देसाई गटाला 31, तर कॉंग्रेसला दोन ग्रामपंचायतींवर ताबा मिळविता आला. 

कऱ्हाडमध्ये कॉंग्रेसची सरशी 
कऱ्हाड तालुक्‍यातील निवडणूक झालेल्या 40 ग्रामपंचायतींच्या निकालांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वरचष्मा राहिला. त्यांच्या गटाला वीस, उंडाळकर गटाला दहा, तर भापजला सहा जागांवर विजय मिळाल्याचा दावा केला जात होता. कऱ्हाड उत्तमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी धक्कादायक निकाल लागले. अधिकृतपणे कोणत्याही नेत्यांनी जागांबाबत दावा केलेला नाही. बऱ्याच ठिकाणी स्थानिक आघाड्या असल्याने अनेक ग्रामपंचायतींवर विविध गटांकडून दावा सांगितला जाऊ शकतो. 

साताऱ्यात राष्ट्रवादी आमदारांचे वर्चस्व 
तीन मतदार संघामध्ये विभागलेल्या सातारा तालुक्‍यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्या भागातील आमदारांचा प्रभाव ग्रामपंचायत निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. मतदान झालेल्या 28 ग्रामपंचायतींपैकी 21 ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व राखण्यात राष्ट्रवादीला यश आले. दोन ग्रामपंचायतींवर ताबा घेत भारतीय जनता पक्षाने तालुक्‍याच्या राजकारणात शिरकाव केला. खासदार उदयनराजे गटाला चार व कॉंग्रेसला आरळे या एकाच ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. कामेरी व सायळी ग्रामपंचायतीवर शिवेंद्रसिंहराजे व मनोज घोरपडे या दोघांनी दावा केला आहे. 

कोरेगावात स्थानिक गटांची बाजी 
कोरेगाव तालुक्‍याच्या ग्रामपंचायत निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेसने 11 ठिकाणी निर्विवाद सत्ता मिळवली. कॉंग्रेसने सहा, तर भाजपने तीन ठिकाणी सत्ता मिळवली. दोन ठिकाणी कॉंग्रेस-भाजप युतीने सत्ता मिळवली. 16 ग्रामपंचायतींवर स्थानिक गटांनी वर्चस्व राखले. त्यांनी आपले पक्ष जाहीर केले नाहीत. मात्र, निकालांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर कदम व युवक तालुकाध्यक्ष राहुल साबळे यांना दणका दिला. जांब खुर्दचे सरपंचपद व खेड आणि हिवरे येथे भाजपने सत्ता घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसला सभापतींच्या कुमठे व उपसभापतींच्या पिंपोडे बुद्रुक गावांमध्ये यश मिळाले. कॉंग्रेसला नागझरी, अपशिंगे, वाघोली, चिमणगावमध्ये सत्ता मिळाली. पिंपोडे खुर्द येथे सत्तांतर झाले असून, याठिकाणची राष्ट्रवादीची सत्ता भाजप- कॉंग्रेस आघाडीने हिसकावली आहे.

Web Title: satara news ncp gram panchayat election result