एमपीएससी मध्येही 'व्यापम' गैरव्यवहार! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत सरकारने सामुहिक कॉपीला उत्तेजन दिले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विद्यमान सरकारने जाणूनबुजून केलेला हा घोटाळा व्यापमपेक्षाही गंभीर असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत सरकारने सामुहिक कॉपीला उत्तेजन दिले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विद्यमान सरकारने जाणूनबुजून केलेला हा घोटाळा व्यापमपेक्षाही गंभीर असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी आपली प्रोफाइल तयार करावी लागते. यामध्ये मोबाईल नंबरही भरावा लागतो. 2017-18 पासून परिक्षार्थींच्या मोबाईल नंबरचे अखेरचे डिजिट ग्राह्य धरून परिक्षार्थीला सीट नंबर दिला जातो. मात्र यात अनेक उमेदवारांनी आपल्या मोबाईलची अखेरची सिरीयल आपल्याला सोयीच्या असलेल्या उमेदवाराशी मिळती जुळती करून प्रोफाईलमध्ये अपडेट केली आहे. त्यामुळे एकमेकांना मदत करू शकणारे उमेदवारांचा सीट नंबर मागे पुढे आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो निकाल आला त्यातही आशा जोड्याच बहुसंख्येने उत्तीर्ण झाल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले. 

त्यामुळे उमेदवारांना सहज अवगत होईल अशी परीक्षा नंबर देण्याची पद्धती आयोगाने कोणाच्या सांगण्यावरून विकसित केली? यामध्ये सरकारचा थेट सहभाग असण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही, नेमक्‍या कोणाच्या भल्यासाठी हा गंभीर घोटाळा घडवून आणला जात आहे? या सर्वांची उत्तरे सरकारने तातडीने द्यावीत. अशी मागणी त्यांनी केली. 

सरकारच्या या अक्षम्य चुकीमुळे प्रामाणिक अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील गरीब व मागासवर्गीय आणि आदिवासी उमेदवार स्पर्धेच्या बाहेर फेकले गेले आहेत. 

या ग्रामीण भागातील गरीब व आदिवासी आणि मागासवर्गीय उमेदवारांच्या नुकसानाची जबाबदारी फडणवीस सरकार घेणार का? असा सवालही तांबे यांनी केला. 

या संदर्भात सरकारने योग्य कारवाई करावी तसेच येऊ घातलेली परीक्षा रद्द करून नव्याने सीट नंबर द्यावेत अशी आमची मागणी आहे, सरकारने या संदर्भात गांभीर्याने घेतले नाही तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत, असेही तांबे म्हणाले.

Web Title: scam at MPSC exam alleged by Satyajit Tambe