शाळा प्रवेशासाठी बालकाच्या वयाची अट शिथील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

शिक्षण विभागाने शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : शिक्षण विभागाने नर्सरी व पहिलीच्या शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्‍चित केले आहे. बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्याची मागणी शिक्षक आणि पालकांकडून करण्यात येत होती. त्याप्रमाणे शिक्षण विभागाने शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. काही दिवस वय कमी भरत असल्याने वयाची अट पूर्ण न करणाऱ्या बालकांच्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

नर्सरी शाळेत प्रवेश घेण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांचे किमान वय ३ वर्षे, तर पहिली प्रवेशासाठी ६ वर्षे असणे बंधनकारक आहे. मात्र, आरटीईच्या नियमानुसार प्रवेश देताना अनेक विद्यार्थ्यांना काही दिवसांसाठी प्रवेश नाकारण्यात येत होते. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता.२५) शिक्षण विभागाने अध्यादेश काढत शाळा प्रवेशात बालकांच्या वयामध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

बहुतांश शाळांचे प्रवेश जूनमध्ये पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या निर्णयाचा फायदा पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school admission age issue