देवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला

सुचिता करमरकर
रविवार, 9 डिसेंबर 2018

कल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज आयोजित १७ व्या देवगंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी मिळत आहे. 

कल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज आयोजित १७ व्या देवगंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी मिळत आहे. 

आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका भारती प्रताप यांना तबल्यावर मंदार पुराणिक आणि संवादिनीवर सिद्धेश बिचोलकर यांनी साथ केली. भारती प्रताप यांनी राग जोग सादर करत आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यानंतर बागेश्री बहार आणि राग सजन सोहिनी हा अनवट राग सादर करत रसिकांची मने जिंकली. तराणा सादर करुन त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.

जागतिक कीर्तीचे व्हायोलिन वादक डॉ एल सुब्रमण्यम यांनी आपल्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. व्हायोलिनवरची त्यांची पकड, दाक्षिणात्य पद्धतीचे वादन, त्यातील लयकारी आणि अभ्यासपूर्ण सादरीकरण यामुळे रसिकांना एक वेगळीच अनुभूती मिळाली. वर्णमने सुरुवात करत त्यांनी वर्णम ही संकल्पना रसिकांना समजावून सांगितली. त्यातील लयीचे बारकावे, विशिष्ट पद्धतीने केली जाणारी लयकारी त्यांनी लोकांसमोर सादर केली. अभोगी रागामधील एक बंदिश त्यांनी सादर केली. दाक्षिणात्य संगीतामध्ये सादर केल्या जाणाऱ्या प्रचलित रचना सादर करत त्यांनी रसिकांना एका वेगळ्या विश्वात नेलं. महागणपतीम या रचनेमध्ये  मृदंगम आणि मोरसीन यांची जुगलबंदी रसिकांची दाद मिळवून गेली. काफी रागामध्ये रचना सादर करून त्यांनी आपल्या वादनाचा शेवट केला.  प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यावेळी उपस्थित होत्या. 
 

Web Title: The second day of the Devgandharva Mahotsav was spent with violin play