सुरक्षा बलाने केले प्रवाशांचे प्रबोधन

रविंद्र खरात 
शुक्रवार, 26 जुलै 2019

कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित माने यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा बलाने गुरुवार (ता. 25) रात्री कल्याण रेल्वे स्थानका मध्ये प्रवाश्यांचे प्रबोधन केले .

कल्याण : 'रेल्वे प्रवास करताना नियमांचे पालन करा , जीव धोक्यात घालून प्रवास करू नका , आपली कोणी तरी वाट पहात आहे' असे आवाहन कल्याण रेल्वे सुरक्षा बला मार्फत रेल्वे प्रवाशांना करण्यात आले आहे .

कल्याण रेल्वे स्थानक मध्ये आठ फलाट असून साडे पाच लाख प्रवासी प्रवास करतात. रोज दरवाजात लटकून प्रवासी वर्गाला प्रवास करावा लागत असून गर्दीमुळे अनेक जण जखमी झाले आहेत तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या धर्तीवर कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित माने यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा बलाने गुरुवार (ता. 25) रात्री कल्याण रेल्वे स्थानका मध्ये प्रवाश्यांचे प्रबोधन केले .

प्रवास करताना रेल्वे रूळ ओलांडून जाऊ नका , एक लोकल गेली म्हणून तिच्या मागे धावून आपला जीव धोक्यात घालू नका, मागून येणाऱ्या लोकलची वाट पहा, पादचारी पुलाचा वापर करा, सरकत्या जिन्याचा वापर करा, लोकलच्या टपावर बसून प्रवास करू नका, लोकलच्या दरवाज्यात लटकू नका आदी सूचना देण्यात आल्या. आपली घरी कोणी तरी वाट पहात आहे, सुरक्षित आणि सुखकर प्रवास करताना नियमांचे पालन करा आणि दुसऱ्या प्रवासी वर्गाला सांगा असे आवाहन करण्यात आले .

- प्रतिक्रिया

1 जानेवारी ते जून 2019 महिन्यात दरवाजा अडवून प्रवास करणाऱ्या 82 तर रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करणाऱ्या 1 हजार 9 प्रवासी वर्गावर कारवाई करण्यात आली असून कारवाई सोबत प्रबोधन ही करण्यात येत आहे अशी माहिती कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित माने यांनी दिली .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security forces made a passengers alert