दुकाने उघडू लागली तरी मुख्य 'आधार' दुरावला, अनलॉकमध्येही विक्रेते हतबल  

मिलिंद तांबे
Saturday, 29 August 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊननंतर सध्या 'अनलॉक'ची प्रक्रिया सुरू झाली आहे. जनजीवन काही अंशी पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. शाळा, महाविद्यालये बंद असली तरी पुस्तकांची दुकाने उघडू लागली; मात्र पुस्तक खरेदीकडे वाचक अद्याप फिरलेलाच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व सुरळीत होत असले, तरी पुस्तकांचा "आधार' या लॉकडाऊनमुळे दुरावल्याची भावना विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. 

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊननंतर सध्या 'अनलॉक'ची प्रक्रिया सुरू झाली आहे. जनजीवन काही अंशी पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. शाळा, महाविद्यालये बंद असली तरी पुस्तकांची दुकाने उघडू लागली; मात्र पुस्तक खरेदीकडे वाचक अद्याप फिरलेलाच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व सुरळीत होत असले, तरी पुस्तकांचा "आधार' या लॉकडाऊनमुळे दुरावल्याची भावना विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. 

वाचा सविस्तर : गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक उपक्रमांवर परिणाम; लॉकडाऊनचा असाही झालाय परिणाम

मार्च महिन्याच्या शेवटचा, तर एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा हा पुस्तक विक्रीचा हंगाम समजला जातो. या दरम्यान ग्रंथालये तसेच वाचनालयांकडून मोठ्या प्रमाणावर पुस्तके खरेदी केली जातात; मात्र पुस्तकविक्रीचा संपूर्ण हंगामच लॉकडाऊनमध्ये गेल्याने मोठी अडचण उभी राहिल्याचे "मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस'चे प्रमुख अशोक कोठावले यांनी सांगितले.

अनेक नव्या पुस्तकांची कामे 70 ते 80 टक्के पूर्ण झाली आहेत. मात्र बाहेरील परिस्थिती "जैसै थे' असल्याने कुणीही नवे पुस्तक प्रकाशित करण्याचे धाडस करत नाही; मात्र लॉकडाऊनच्या काळात वाचकांना काही तरी नवीन मिळावे, यासाठी आम्ही "भालचंद्र नेमाडे- व्यक्ती, विचार आणि साहित्य' तसेच "पंगतीतलं पान' ही दोन पुस्तके वाचकांच्या भेटीला आणल्याचेही कोठावले यांनी सांगितले. 

साहित्य खरेदीही थांबली 

  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पुस्तकांची दुकानेही बंद आहेत. या दरम्यान शाळा तसेच महाविद्यायलयीन पुस्तकांची विक्री अधिक प्रमाणात होत असते. या वेळी ती बंद असल्याने खरेदीही झाली नाही. आता हळूहळू दुकाने उघडू लागली आहेत. मात्र ग्राहकांचा फारसा प्रतिसाद दिसत नाही. जेमतेम 15 ते 20 टक्के ग्राहक दुकानांना भेटी देत असल्याचे "आयडियल बुक डेपो'चे मंदार नेरूरकर यांनी सांगितले.
  • लॉकडाऊनमुळे साहित्य विक्री व्यवसायावर साधारणतः 60 टक्के परिणाम झाला आहे. जे प्रकाशक स्वतः रिटेलर आहेत, त्यांना या परिस्थितीचा तडाखा कमी प्रमाणात बसला; मात्र ज्या प्रकाशकांकडे पुस्तकविक्रीची सुविधा नाही त्यांच्यावर मात्र मोठी संक्रांत ओढवली आहे. वर्षभरात 800 ते 1000 नवीन पुस्तकांचे प्रकाशन व्हायचे, हा आकडा आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकाही नाही. 

ऑनलाईनवर भर 
लॉकडाऊनच्या काळात पुस्तकांची प्रत्यक्ष खरेदी-विक्री रोडावल्याने अनेक प्रकाशकांनी ऑनलाईन पुस्तकविक्रीवर भर दिला. ग्राहकांनीही ऑनलाईन खरेदीला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला. दिवसाला साधारणतः 25 पुस्तकांची मागणी होती. खास करून मुंबईबाहेर दूर राहणाऱ्या वाचकांनी पुस्तकांची ऑनलाईन खरेदी केली; मात्र लॉकडाऊन काळात कुरिअर सेवा बंद झाल्याने वाचकांपर्यंत पुस्तक पोचवणे अवघड झाले. शिवाय पावसात पुस्तक भिजण्याचा धोका अधिक असल्याने काही मर्यादा आल्या. त्यामुळे आम्हाला शेवटी कुरिअर सेवा सुरू होण्याची वाट पाहावी लागल्याचे अशोक कोठावळे सांगतात. 

क्लिक करा : 'बबड्याच्या हट्टापायी' या ट्विटनंतर रोहित पवारांचे आशिष शेलारांना जशाच तसे उत्तर

रेल्वे सेवेचा परिणाम 
मुंबईत दादर, गिरगाव, प्रभादेवी परिसरात पुस्तकांची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये येणारा वाचक हा आसपासच्या परिसरात राहणारा आहे. त्याच्याकडून सध्या पुस्तकाच्या दुकानांना प्रतिसाद मिळतोय. दादरमधील दुकानांमध्ये केवळ मुंबईच नाही, तर ठाणे, कल्याण, डोंबिवली इथपासून ते गोव्यापर्यंतचे वाचक पुस्तक नेण्यासाठी येत होते; मात्र सध्या रेल्वे सेवा बंद असल्याने त्याचा मोठा परिणाम पुस्तकांच्या विक्रीवर झाल्याचे काही पुस्तक विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

दिवाळी अंकाबाबत संभ्रम 
दिवाळी अंकाचे काम साधारणतः सप्टेंबर महिन्यात सुरू होते; मात्र कोरोना काळात हे काम आता मागे पडले आहे. लॉकडाऊन केव्हा उठेल किंवा परिस्थिती कधी पूर्ववत होईल, याची कल्पना नसल्याने दिवाळी अंकांबाबत प्रकाशक संभ्रम आहेत. 

पुस्तक विक्रेत्यांच्या या आहेत अडचणी 

  • लॉकडाऊनमुळे वितरण व्यवस्था बंद 
  • ग्रंथालय, वाचनालय बंद असल्याने मोठा फटका 
  • सरकारी खरेदीची ऑर्डर निघाली; पण खरेदी नाही 

लॉकडाऊनमध्ये जवळ असणारी अनेक पुस्तके वाचली. पुस्तकांची दुकानं सुरू झाल्याने आणखी काही पुस्तके घेता येतील. एखादी दर्जेदार कादंबरी घेण्याचा विचार आहे. 
- यशस्वी पाटील, वाचक 

मी स्वतः दुकानात जाऊन पुस्तक विकत घेतो. त्यामुळे आपल्याला खूप पुस्तके न्याहाळता येतात; शिवाय नवीन पुस्तकांची माहितीही घेता येते. ऑनलाईन पुस्तके मागवण्यात काही मजा नाही. 
- योगेश माने, वाचक 

------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the sellers in tense even in the unlock, No response from readers