युतीची चर्चा वादळी होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबईला माफियांपासून मुक्त करणार म्हणजे करणारच. युती होईल अथवा नाही, आम्ही लढणार म्हणजे लढणारच.
- किरीट सोमय्या

मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईत युती करण्यासाठी एकीकडे भाजप पुढाकार घेत आहे, तर दुसरीकडे पारदर्शकतेचा मुद्दा मांडतानाच सत्तेसाठी नाही, तर अजेंड्यासाठी युती करण्याची भूमिका मांडून एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शिवसेनेने खमकी भूमिका घेत पारदर्शकतेचा मुद्दा ग्राह्य न धरता सोमवारी (ता. 16) जागावाटपापासूनच युतीच्या चर्चेला सुरवात होईल, असे स्पष्ट केले आहे. दोन्ही पक्षांची परस्परविरोधी भूमिका असल्याने युतीची चर्चा पहिल्या दिवसापासूनच वादळी होण्याची शक्‍यता आहे. मुंबईतील तिढा सुटला, की इतर ठिकाणीही युती होण्यात अडचण येणार नाही.

भाजपकडून जागावाटपाच्या मुद्द्यापेक्षा पारदर्शकतेच्या मुद्द्यावर युती व्हावी असा आग्रह धरण्यात आला आहे. त्याचबरोबर युती सत्तेसाठी नाही, तर अजेंड्यासाठी होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले, त्यावर शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे शिवसेनेने भाजपचा अजेंडा फेटाळून लावला आहे. भाजपच्या अटींवर युतीची चर्चा होणार नाही, अशी ठाम भूमिकाही घेण्यात आली आहे. युतीसंदर्भात सोमवारी होणाऱ्या चर्चेत पारदर्शकता हा मुद्दाच नसेल, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आल्याचे समजते.

या चर्चेसाठी भाजपकडून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार; तर शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई आणि विभागप्रमुख ऍड. अनिल परब हे चर्चेत सहभागी होणार आहेत. भाजपला पहिल्याच दिवशी त्यांच्या अजेंड्यावर चर्चा करायची आहे. तर, शिवसेनेला या अजेंड्यात काडीचाही रस नाही. त्यामुळे पहिल्याच दिवशी एकमेकांचा मुद्दा पुढे येईल, अशी शक्‍यता आहे.

"शिवसेनेच्या कामात पारदर्शकता होती, त्यामुळेच मुंबईतील मतदारांनी 20 वर्षं पक्षाला बहुमत दिले, त्यात भाजपही सोबत होता.''
- अनिल देसाई, शिवसेना नेते

आघाडीचीही चर्चा
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या जागावाटपासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची चर्चा उद्यापासून होण्याची शक्‍यता आहे. याबाबत दोन्ही पक्षांचे राज्यस्तरीय नेते उद्या मुंबईत भेटणार असल्याचे समजते.

मुंबई आणि इतर महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकींचा विचार करता दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांची आघाडीने निवडणुका लढण्याची तयारी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दोन्ही कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांनी स्थानिक परिस्थिती आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन आघाडी करावी, तसेच जागावाटपही करावे, असे आवाहन केले आहे. यानुसार ठाणे महानगरपालिकेत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची युती झाल्यात जमा आहे. याबाबत कॉंग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आघाडीबाबत आग्रही आहेत. तसेच, मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेस सोबतच्या आघाडीसाठी आग्रही आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीरपणे आघाडीसाठी कॉंग्रेसला आवाहन केले आहे. मात्र कॉंग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधामुळे ही आघाडी होऊ शकली नाही, असे अहिर व तटकरे यांनी म्हटले आहे. तसेच, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आग्रही असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आघाडी विरोधक असल्याचे सांगितले जाते. असे असले तरी उद्या मुंबईत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्‍यता आहे.

आजपर्यंत आपण गद्दारांशी लढलो, इतकेच नाही तर रक्ताचे नाते असलेल्या नातेवाइकांशीही लढलो. मात्र, या निवडणुकीत वेळप्रसंगी कपटी व चाणाक्ष मित्रांसोबत लढावे लागू शकते, त्यामुळे सावध राहा.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

Web Title: sena bjp talk to heat up politics