Mumbai Crime News : लोकलमध्ये प्रवाशाच्या मारहाणीत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 senior citizen died after beaten in local train police arrested suspect mumbai

Mumbai Crime News : लोकलमध्ये प्रवाशाच्या मारहाणीत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

डोंबिवली - कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानक दरम्यान लोकलमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला माल वाहतूक डब्यात बेदम मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. बबन हांडे - देशमुख (वय 65) असे मयत प्रवाशाचे नाव आहे.

आंबिवली येथे राहणारे बबन हांडे देशमुख हे गुरुवारी दुपारी काही कामानिमित्त कल्याण येथे आले होते. काम आटोपल्यानंतर ते कल्याण रेल्वे स्थानकातून टिटवाळा लोकलने घरी चालले होते. सामान्य डब्यात गर्दी असल्याने बबन लोकल मधील मालवाहतूक डब्यात चढले. लोकलमध्ये चढत असताना त्यांचा धक्का एका प्रवाशाला लागला.

याबद्दल बबन यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या प्रवाशाने बबन यांना मालवाहतूक डब्यात बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लोकल धावती असल्याने इतर डब्यातील प्रवाशांना माल वाहतूक डब्यात काय चालले हे कळले नाही. बेदम मारहाण झाल्याने बबन यांचा जागीच मृत्यू झाला.

मारेकरी टिटवाळा स्थानक येण्यापूर्वीच लोकलमधून उतरुन पळून गेला. टिटवाळा रेल्वे स्थानकात माल वाहतूक डब्यात एक व्यक्ति मरण पावल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. लोहमार्ग पोलिसांनी बबन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.