ज्येष्ठ नागरिकांच्या क्वांरटाइन संदर्भात मोठी अपडेट, पालिकेनं बदलला नियम

पूजा विचारे
Wednesday, 16 September 2020

 कोरोनाची लक्षणे नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घरीच क्वारंटाइन करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. मुंबईत सुरुवातीपासून वयोवृद्ध रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे.

मुंबईः  गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून कोरोना व्हायरस मुंबईत तळं ठोकून आहे. गेल्या महिन्यापासून मुंबई शहर कोरोनासारख्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई शहरात आढळून आला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून अजूनही विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे.  पालिकेनं कोरोना रुग्णांच्या क्वारंटाईनच्या नियमावलीत मोठा बदल केला आहे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घरीच क्वारंटाइन करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. मुंबईत सुरुवातीपासून वयोवृद्ध रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे २१ ऑगस्टला वयोवृद्ध रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रुग्णांवर पालिका रुग्णालयातच उपचार केले जातील, असं स्पष्ट केलं होतं. 

मात्र,  मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये खाट मिळत नाहीत तर पालिका आणि कोविड केंद्रांमध्ये उपचार करून घेण्यास बहुसंख्य नागरिक तयार होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे पालिकेनं आपल्या निर्णयात बदल करत वयोवृद्ध रुग्णांवर रुग्णालयातच उपचार करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पालिकेच्या नव्या निर्णयानुसार, आता वयोवृद्ध रुग्णांना घरातच क्वारंटाइन केले जाणारेय. दरम्यान घरातूनच उपचारांचा फॉलोअप घेतला जाईल. स्थिती गंभीर असेल किंवा रुग्णालयात दाखल करण्याची गरज असेल, तरच त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात येणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. 

अधिक वाचाः तीन दिवसांच्या चौकशीत NCB नं रियाला विचारले हे ५५ प्रश्न, अभिनेत्रीला फुटला घाम

मुंबईतला रुग्णवाढीच्या दरात वाढ

मंगळवारी मुंबईत वाढलेला रुग्णांचा आकडा दोन हजारच्या खाली आला. मंगळवारी  दिवसभरात 1,585 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,73,534 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.24 वरून वाढून 1.28 टक्क्यांवर  गेला आहे. मुंबईत काल दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,227 वर पोहोचला आहे. मुंबईत मंगळवारी 1,717 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 77 टक्के इतका आहे.

मुंबईत मंगळवारी नोंद झालेल्या 49 मृत्यूंपैकी 37 जणांना दीर्घकालीन आजार होते. मंगळवारी एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 36 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 31 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षाखालील होते.  33 रुग्णांचे वय 60 वर्षावर होते. तर 14 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते. 

अधिक वाचाः तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन गेली कार, पुढे झालं असं की...

मंगळवारी 1,717 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 1,34,066 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 54 दिवसांवर गेला आहे. 14 सप्टेंबर पर्यंत एकूण 9,36,574  कोविड चाचण्या करण्यात आल्या.  8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.28 वर स्थिर आहे.

Senior citizens quarantined at home decision taken Mumbai Municipal Corporation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior citizens quarantined at home decision taken Mumbai Municipal Corporation