पनवेल येथील इंडिया बुल्स विलगीकरण केंद्र बंद? नवी मुंबईत उपचारावर महापालिकेचा भर 

पनवेल येथील इंडिया बुल्स विलगीकरण केंद्र बंद? नवी मुंबईत उपचारावर महापालिकेचा भर 

नवी मुंबई : कोरोना रुग्णांसाठी नवी मुंबई महापालिकेचे पनवेल येथील इंडिया बुल्स इमारतींमध्ये विलगीकरण केंद्र आहे. ते लवकरच बंद करण्यात येणार असल्याचे समजते. डॉक्‍टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेबाबत आरोग्य विभागासमोर अडचणी होत्या. तसेच रुग्णही एवढ्या दूरवर जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे पेच होता. आता बहुतांश रुग्णांना नवी मुंबईतील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे. 

कोरोना संसर्ग वाढला, त्या वेळी नवी मुंबई महापालिकेने शहराबाहेर कोन गावाजवळच्या इंडिया बुल्स इमारतींमध्ये विलीकरण केंद्र सुरू केले होते. या ठिकाणी राहण्यापासून खाण्या-पिण्याची व्यवस्था, गरम पाणी, डॉक्‍टरांच्या सल्ल्यासहीत गोळ्या-औषधे आणि ने-आण करण्याची व्यवस्था केली होती; परंतु शहराबाहेर असणाऱ्या या केंद्रात काही रुग्णांना असुविधा झाल्यामुळे, तसेच नातेवाईकांपासून दूर असल्यामुळे प्रचंड विरोध होण्यास सुरुवात झाली. तसेच एका बंद खोलीत एकच रुग्ण असल्यामुळे रुग्णांना एकटेपणा जाणवू लागल्याने विरोध वाढला होता. या केंद्रात डॉक्‍टर आणि इतर कर्मचारी उपलब्धता करताना प्रशासनाला नाकी नऊ येऊ लागले होते. 

नवीन विलीकरण केंद्रांमुळे भार कमी 
महापालिकेतर्फे ऐरोली येथे लेवा पाटीदार सभागृह, तुर्भे येथे एपीएमसी मार्केटमध्ये निर्यात भवन आणि सानपाडा येथे राधास्वामी सत्संग आश्रम या तीन ठिकाणी नव्याने विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी लेवा पाटीदार सभागृहात 302 रुग्णांची क्षमता असून 140 रुग्ण आहेत. निर्यात भवन 418 क्षमतेपैकी 126 आणि राधास्वामी सत्संग आश्रमात 418 क्षमतेपैकी 157 रुग्णांना विलग करून ठेवण्यात आले आहे. नेरूळ एमआयडीसीमध्ये रहेजा येथे तयार करण्यात येत असणाऱ्या 750 क्षमतेच्या नव्या विलगीकरण केंद्रांमुळे इंडिया बुल्सची भविष्यातील गरजही संपणार आहे. 

 

पनवेल येथील इंडिया बुल्स विलगीकरण केंद्र पूर्णपणे बंद करण्यात आले नाही. मात्र सध्या शहरात तयार केलेल्या विलगीकरण केंद्रात रुग्णांची व्यवस्था होत असल्याने त्या ठिकाणी रुग्ण पाठवणे बंद केले आहे. 
- अभिजीत बांगर,
आयुक्त, नवी मुंबई महापालिका. 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com